केपटाऊन : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचाविरुद्धची तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील दुसर्या सामन्यात विजय मिळवत यजमान दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. हा सामना झाल्यानंतर चक्क दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फार कमी प्रसंग आले आहेत जेव्हा एक नव्हे; तर दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला. त्याचबरोबर एकाच संघातील दोन खेळाडूंना सामनावीर म्हणून गौरवण्याची घटना फक्त दोन वेळा झाली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्या वनडेत दोन खेळाडूंनी त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सामनावीर पुरस्कार मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या लुंगी नगिदीच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 271 धावांवर संपुष्टात आला. लुंगीने सहा बळी टिपले. त्यानंतर आफ्रिकेला पहिला धक्का एक धाव संख्येवर बसला, पण मलानने 139 चेंडूंत सात चौकार व चार षटकारांसह 129 धावा केल्या. लुंगी आणि मलान यांनी शानदार कामगिरी केल्याने दोघे सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.