Breaking News

शिवसेनेकडून मराठी माणसाचा विश्वासघात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची घणाघाती टीका

महाड : प्रतिनिधी

हे राज्य सरकार कोकणाचं नाही किंवा मराठी माणसाचं नाही. सत्तेसाठी शिवसेनेने कोकण आणि मराठी माणसाचा विश्वासघात केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 23) महाड येथे केला.

महाड येथे आमदार प्रवीण दरेकर यांचा सोमवारी जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. शेतकर्‍यांच्या बांधावर जावून हेक्टरी 25 हजार आर्थिक मदत देऊ, असे सांगणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वचनाला जागले नाहीत. शेतकर्‍यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त हे सरकार करू शकले नाही. फडणवीस सरकारने आठ लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीमध्ये आणले. त्यातील तीन लाख शेतकर्‍यांची वनटाईम सेटलमेंटमध्ये कर्जे माफी झाली, तर पाच लाख शेतकर्‍यांची कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. या सरकारने केवळ 50 हजार वाढवून दिले, मात्र तेही जूनमध्ये देणार आहेत, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

या राज्य सरकारच्या काळात कायदा-सुव्यवस्था ढासळली असून उघडउघड गोळ्या झाडल्या जात आहेत. गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढणार असेल तर ते राज्यास घातक आहे, असे दरेकर म्हणाले. मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानभरपाईसाठी 500 कोटींचे पॅकेज द्यावे, मराठी भाषा सक्तीची करावी, विनाअनुदानित शिक्षकांना शंभर टक्के अनुदान द्यावे, किल्ले रायगडच्या धर्तीवर चवदार तळे आणि नरवीर तानाजी मालुसरेंच्या जन्मगाव उमरठचा विकास करावा, अशा अनेक मागण्या सभागृहात सरकारकडे केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सायंकाळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले, जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, शहराध्यक्ष डॉ. अजय जोगळेकर, माजी जिल्हाध्यक्ष शेखर ताडफळे, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

माणगावात जोरदार स्वागत

माणगाव : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर आमदार प्रवीण दरेकर सोमवारी (दि. 23) प्रथमच रायगड जिल्हा दौर्‍यावर आले असता माणगावात भाजपकडून त्यांचे जोरदार स्वागत

करण्यात आले.

भाजपचे अलिबाग मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, भालचंद्र महाले, सुरेंद्र साळी, चिन्मय मोने, राकेश गोसावी, गोविंद कासार, राकेश पवार, राजू मुंडे, बाबूराव चव्हाण, अनिकेत ठाकूर, गणेश भोनकर, शर्मिला सत्वे, अश्विनी खरे, दीपाली जाधव, स्मिता भोईर यांच्यासह तालुक्यातील भाजप कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी माणगाव विश्रामगृहात अधिकार्‍यांची बैठक घेतली. उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर व तहसीलदार प्रियांका आयरे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन या वेळी प्रवीण

दरेकर यांनी दिले.

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील

पाली : प्रतिनिधी

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 23) पालीतील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. या वेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या वेळी आमदार दरेकर यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, शेतकर्‍यांची पूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

 भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत घोसाळकर, सुधागड तालुका माजी अध्यक्ष राजेंद्र गांधी, युवा नेते अनुपम कुलकर्णी, प्रकाश ठोंबरे, शिरीष सकपाळ, वा. सु. मराठे, रवींद्र जंगम, अरुण खंडागळे, अजय खंडागळे, विजय देशमुख, संदेश सोनकर आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply