Breaking News

जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी

जुनी पेन्शन योजना, मयत डीसीपीएस धारकांच्या कुटुंबांना 10 लाखांची मदत मिळावी आणि इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी शनिवारी (दि. 21) जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या वेळी जुनी पेन्शन योजना लागू करा, अशा घोषणा शिक्षकांनी देऊन परिसर दणाणून सोडला. या वेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. राज्य शासनाने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यानिमित्ताने संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर जिल्ह्यातील शिक्षकांनी शनिवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, जिल्हाध्यक्ष संजय निजापकर, जिल्हा कार्याध्यक्ष उदय गायकवाड, जिल्हा कार्यवाह विजय पवार, वैभव पिंगळे यांच्यासह जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते.

जुनी पेन्शन योजना लागू करणे, डीसीपीसीधारकांना सातव्या वेतनाची थकीत रक्कम अदा करणे, मयत धारकांच्या कुटुंबांना 10 लाख मदत जाहीर करणे, निवड श्रेणीचे व वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढावेत, निवड श्रेणीसाठी एकच निकष करावे, रिक्त पदे त्वरित भरावी, शिक्षकांना मेडिक्लेम योजना लागू करावी, बिंदूनामावली तातडीने पूर्ण करावी, 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळांना आर्थिक मदत आणि वीजबिल देयके भरावी, बीएलओ काम रद्द करावे, अशा मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना दिले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply