महाडमधील पारंपरिक भांडी व्यवसाय आता हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी महाडमध्ये भांडी घडवण्याचा मोठा व्यापार होता तो केवळ चाळीस ते पंचेचाळीस कारखान्यांवर येवून ठेपला आहे. या व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने तरुण पिढी यामधून बाहेर पडू लागली आहे.
महाड हे पूर्वीचे बंदर असलेले व्यापारी केंद्र. बौद्ध काळापासून याला व्यापारी केंद्राचा दर्जा राहिला आहे. विविध व्यवसाय महाडमध्ये उभे राहिले. यामुळे महाडमधील विविध व्यवसायांची ओळख शैक्षणिक अभ्यासक्रमात देखील मिळते. यापैकीच एक असलेला भांडी व्यवसाय आता हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आहे. महाड शहरातील हा व्यवसाय बंद पडून तो आता ग्रामीण भागात पसरला मात्र त्याला देखील गती मिळाली नाही. महाड शहरात तांब्या, पितळेची भांडी तयार करून बाहेर पाठवली जात होती. काळाच्या ओघात हा व्यवसाय मागे पडू लागला आहे. गेल्या काही वर्षात महाड शहरात अवघे दोनच कारखाने सुरु राहिले आहेत. यामुळे शहरातील तांबट आळीमधील भांड्यावरील ठकठक बंद पडली आहे. भांड्यासाठी लागणारा कच्चा माल आणून त्यातून हंडा, कळशी, तांब्या, टोप, किटली अशी अनेक प्रकारची भांडी महाडमध्ये बनवली जात होती. या व्यवसायाला काळाच्या ओघात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने अनेकांनी या व्यवसायातून बाहेर पडणे पसंत केले. यामुळे महाड शहरात भांडी घडवण्याचा व्यवसाय बंद पडला असला तरी शेजारील ग्रामीण भागात हा व्यवसाय तग धरून आहे.
महाड शहरालगत असलेल्या चोचींदे, किंजळघर, गांधारपाले, वानिकोंड, मुळगाव, या गावातून केवळ 40 ते 45 जनांच्या घरी भांडी घडवण्याचा व्यवसाय सुरु आहे. मात्र याकरिता लागणारा कच्चा माल आता बाहेरील भांडी व्यापारी पुरवू लागले आहेत. आणि तयार भांडी देखील हेच व्यापारी घेत आहेत. यामुळे केवळ मजुरी वरील हे व्यवसाय सुरु असल्याने यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भांडी घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या भट्टी करिता कोळसा मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेकवेळा याकरिता वन विभागाच्या कारवाईला देखील तोंड द्यावे लागत आहे. धातूला एका विशिष्ट उष्णतेवर तापवून मग त्याला भांड्याचा आकार द्यावा लागतो. याकरिता कोळसा गरजेचा असल्याचे येथील कारागीर सांगतात. भांडी घडवण्याचा हा व्यवसाय केवळ तीन महिनेच सुरु राहतो. त्यानंतर पावसाळ्यात मागणी घटत असल्याने पावसाळ्यात शेती किंवा अन्य कामावर लक्ष केंद्रित करावे लागते. तांबे आणि पितळ हे दोन्ही धातू बदलत्या वातावरणात काळपट पडतात. यामुळे अनेकवेळा बनवलेल्या भांड्यांना चिंच किंवा अन्य रसायनांचा वापर करून चमक आणावी लागते. यासाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च होतो. अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने उरलेले कारगीर हे मजुरी तत्वावर आपली कला जिवंत ठेवून आहेत असे चंद्रकांत मनवल यांनी सांगितले.
महाड शहरातील भांडी व्यवसाय बंद पडल्यानंतर त्याठिकाणी कामाला असलेल्या कारागिरांनी ग्रामीण भागात हि कला जपली मात्र यात अनेक समस्या आहेत. मजुरीतून मिळणार्या उत्पन्नापेक्षा वेळ आणि श्रम खूपच लागतात. यामुळे तरुण पिढी यातून बाहेर पडू लागली आहे. -गणेश भुवड भांडी कारागीर
-महेश शिंदे