Breaking News

सीमावर्ती भागात महाराष्ट्र अन् कर्नाटक पोलिसांचे संयुक्त चेकपोस्ट ः सुहास वारके

 सोलापूर ः प्रतिनिधी

 सध्या राज्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी प्रशासनाने महामार्ग, सीमावर्ती भागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस प्रशासनाची एक बैठकही झाली आहे. सीमावर्ती भागातून होणारी गुन्हेगारी कारवाई रोखण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पोलिसांचे संयुक्त चेकपोस्ट उभारण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी दिली.

लोकसभा निवडणुकांसह पोलीस ठाण्यांचे इन्स्पेक्शन, जनतेच्या भेटीगाठी घेण्यासाठी वारके विशेष पोलीस महानिरीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. गुरुवारी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेतली. या वेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत आदींची उपस्थिती होती.

या वेळी त्यांनी मोक्का कायद्यांतर्गत वाळू चोरट्यांवरील  कारवाईला प्राधान्य देताना अनेक सामाजिक प्रश्नही हाताळले जात असल्याचे स्पष्ट केले. निर्भया पथकाद्वारे वा अन्य प्रकारच्या गुन्हेगारांवरील कारवाईसोबतच समुपदेशनावर भर दिला जात आहे. मुलांना योग्य दिशा दाखविली जात आहे. दहशतवादी कारवायांच्या प्रश्नांवर कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्वच यंत्रणा सज्ज असून, रेकॉर्डवरील संशयितांवर वॉच असणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात सोळा हजारांहून अधिक गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित आहे. निवडणुकीच्या कालावधीत त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असल्याचे सांगितले. महामार्गावर बीट पेट्रोलिंगची पद्धत अवलंबण्यात येत आहे. अपघात कमी करण्यासाठी ही योजना असून, मृत्यू पावणार्‍या लोकांची संख्या कमी होण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. यासाठी पोलिसांची कुमकही अधिक वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी महामार्गांवरील गावांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. अपघात रोखण्याबरोबरच ते होऊ नयेत यासाठी चालकांचे समुपदेशन करण्यावरही अधिक भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.  देशभरातून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असताना त्यादृष्टीने पंढरपुरातील सुरक्षा व्यवस्था अधिक उत्तम करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. वाळू तस्करांच्या कारवाईला चांगला प्रतिसाद मिळतोय. याशिवाय पोलीस ठाण्यात येणार्‍या लोकांना प्रशासनाकडून कितपत समाधान मिळतेय याचाही मागोवा घेण्यात येत असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply