Breaking News

गाडली गेली घरे, उद्ध्वस्त झाले संसार!

 महाडमध्ये पुरात तीन, तर दरडीखाली 84 मृत्यू ;  हजारो कोटींचे नुकसान

महाड : प्रतिनिधी

तालुक्यात 22 जुलै रोजी झालेल्या महाप्रलयात तळीये गाव नकाशावरूनच गायब झाले, तर महाड शहरासह सुमारे 103 गावांना या महापुराचा फटका बसला आहे. यामध्ये हजारो कोटींचे नुकसान झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता आहे.

महाप्रलयाने महाड शहरासह तालुक्याचे पार कंबरडे मोडले आहे. सावित्री काळ आणि गांधारीने पातळी ओलांडून शहरात प्रवेश केला. वाहनांसह घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले. गेल्या सहा दिवसांनंतरही तालुक्याचा वीजप्रवाह सुरळीत झालेला नाही. हजारोंचे संसारच उद्ध्वस्त झाले आहेत. पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की, मोठमोठी वाहने पलटी झाली, तर दुकांनाचे शटर फोडून सामान वाहून गेले आहे. तळीये गावावर दरड कोसळून पूर्ण गावच गाडले गेले. यामध्ये 84 जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.

महाडच्या महापुरात कुंदा जाधव (रा. नवेनगर), सुवर्णा महाडिक (रा. नवेनगर), संजय नाटखेड (रा. रोहिदास नगर) यांचा मृत्यू झाला, तर राजेवाडी येथील बिहारीलाल रविदास हा बेपत्ता आहे. महाड तालुक्यात 64 गावांतील पूर्णतः तर 103 गावांतील अंशतः असे एकूण 15,400 घरांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील 97 जनावरे दगावली असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या महापुरात लाडवली, तेटघर, महाड शहर, आसनपोई, बिरवाडी, दासगाव, दाभोळ, केंबुर्ली, गंधारपाले, मोहोप्रे, टोळ, चांभारखिंड, करंजखोल, नडगाव, खरवली, आकले, भोराव, गोंडाळे, काचले, राजेवाडी, कोंडीवते, शिरगाव, दादली, वहूर, सव, चोचिंदे, चांढवे (बुद्रुक), चांढवे (खुर्द), कांबळे, वराठी, गोठे (खुर्द), गोठे (बुद्रुक), तेलंगे, ओवळे, वीर, जुई, मुठवली, चोचिंदे कोंड, जुई या गावांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मदतीचा ओघ वाढला आहे, तर शहराची स्वच्छता करण्यासाठी हजारो हात सरसावले आहेत. वाहनांची दुरुस्ती हा मोठा प्रश्न असून त्याची नुकसानभरपाई मिळेल का, हा प्रश्न आहे. शासनाचे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, मात्र जी तत्काळ मदत मिळायला हवी ती मिळत नाही. पंपावर पेट्रोलसाठी भली मोठी रांग आहे, पण खिशात आणि बँकेत पैसे नाहीत. गुगल पे चालत नाही आणि मोबाइल सेवा गेले सहा दिवस ठप्प आहे. आजही पूर्ण तालुक्यातील वीज सुरळीत झालेली नाही. लोकांना प्यायला पाणी मिळतेय, पण आंघोळ आणि कपडे धुवायला पाणी नाही. या महापुराने महाड तालुक्याचे हजारो कोटींचे नुकसान करून 87 जणांचे प्राण घेतले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply