Breaking News

श्रीसंतला ‘सर्वोच्च’ दिलासा

न्यायालयाने आजीवन बंदी उठवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आरोप झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आजीवन क्रिकेटबंदी घातलेला भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज एस. श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. श्रीसंतवरील आजीवन बंदी न्यायालयाने उठवली आहे.

2013 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप श्रीसंतवर झाला. त्यानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती. या कारवाईला श्रीसंतने आधी केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयचा निर्णय उचलून धरला. त्यानंतर श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथे त्याला शुक्रवारी (दि. 15) दिलासा मिळाला. श्रीसंतवरील बंदीचा कालावधी खूपच जास्त आहे. बीसीसीआयने त्यावर फेरविचार करावा आणि तीन महिन्यांत निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले, परंतु खेळाडूला शिक्षा देण्याचा अधिकार बीसीसीआयला नाही, हा श्रीसंतचा युक्तिवाद मात्र न्यायालयाने फेटाळून लावला. क्रिकेटपटूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

‘चेंडू’ बीसीसीआयकडेच!

श्रीसंतवरील आजीवन बंदी उठली असली तरी तो लगेचच क्रिकेटच्या मैदानावर येण्याची शक्यता कमी आहे. कारण श्रीसंतवरील बंदीचा नवा कालावधी नेमका किती असावा हे ठरविण्याचा अधिकार बीसीसीआयलाच देण्यात आला आहे. त्यावर निर्णयासाठी बीसीसीआयला अजून तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावरील बंदी पूर्ण उठवली जाईल की आणखी काही वर्षे त्याला मैदानाबाहेर ठेवले जाईल, हे पाहावे लागणार आहे.

Check Also

‘जय संतोषी माँ’ 49; सुपर हिटचा सर्वकालीन बहुचर्चित चमत्कार….

पिक्चरच्या जगात सुपर हिट, मेगा हिट फिल्मची कोणतीही रेसिपी, तराजू, थर्मामीटरम कॅल्क्युलेटर, लॅपटॉप नाही. जगातील …

Leave a Reply