मुंबई ः प्रतिनिधी
सायबर ठकाने मिझोरमला गाडी पोहचविण्याच्या नावाखाली कोस्टगार्ड अधिकार्याच्या पत्नीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पवई येथे राहणार्या तक्रारदार यांचे पती हे कोस्टगार्डमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पतीचा मित्र मिझोरम येथे राहतो. त्यांना एक सेकंडहँड स्कॉर्पिओ गाडी हवी होती. फेब्रुवारीमध्ये त्यांनी कल्याण येथील एका डीलरकडून सव्वातीन लाख रुपयांना स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली. खरेदीनंतर कागदपत्रांची पूर्तता करून स्कॉर्पिओ मिझोरमला पाठविली जाणार होती. मुंबईमधून गाडी मिझोरमला पाठवण्याकरिता मूव्हर्स आणि पॅकरची ऑनलाइन माहिती काढली. त्यांनी एका प्रसिद्ध मूव्हर्स आणि पॅकरचा ऑनलाइन क्रमांक मिळविला. त्या नंबरवर त्यांनी संपर्क केला.या घटनेनंतर सायबर भामट्याचा त्यांना फोन आला. गाडी पाठवण्याकरिता प्रकिया करायची असून दोन माणसे पाठवली आहेत, असे तक्रारदारांना सांगण्यात आले. त्यावर तक्रारदारांनी विश्वास ठेवला. तक्रारदारांनी त्याच्या परिचित असलेल्या व्यक्तीला गाडीची चावी दिली. चावी दिल्यावर विश्वास बसावा म्हणून त्यांना भामट्यांनी एक इन्व्हॉईस दिले. सहा दिवसांनंतर गाडी मिझोरमला पोहचेल, अशा त्या दोघांनी भूलथापा मारल्या. गाडी पाठवण्याकरिता ऑनलाइन फी म्हणून 33 हजार 806 रुपये ऑनलाइन बँक खात्यात जमा केले. मार्च महिना उजाडला तरी गाडी न मिळाल्यामुळे मिझोरममधील व्यक्तीने तक्रारदारांशी संपर्क साधला. त्या इन्व्हॉईसवरून तक्रारदारांनी एका प्रसिद्ध मूव्हर्सशी संपर्क साधला तेव्हा परळ किंवा कळंबोली येथे मूव्हर्सचे कार्यालय नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तत्काळ पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.