आई व बाळ दोघेही सुखरूप
पनवेल, नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिकेच्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या वाशी येथील रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेची यशस्वीरित्या प्रसूती करण्यात आली. ही महिला व बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाचे ’कोविड-19’ रुग्णालयात काही दिवसांपूर्वी रूपांतर करण्यात आले. त्यानंतर या रुग्णालयात रविवारी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या एका कोरोनाबाधित गर्भवती महिलेची शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी प्रसूती करण्यात आली. या महिलेने मुलीला जन्म दिला असून तिचे वजन अडीच किलो आहे. प्रसुतीनंतर आईला आयसीयूत तर बाळाला एनआयसीयूत ठेवण्यात आल्याची माहिती डॉ. राजेश म्हात्रे यांनी दिली. घणसोली येथे राहणारी ही महिला मार्चमध्ये मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात चार दिवस दाखल झाली होती. त्यावेळेस तिला प्रसुतीसाठी 5 एप्रिल तारीख देण्यात आली. ही महिला जे जे रुग्णालयात टॅक्सीतून गेली होती. या प्रवासादरम्यान तिला कोरोनाची लागण झाली. तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी महापालिकेला प्राप्त झाला. रविवारी प्रसुतीची तारीख दिली असल्यामुळे नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला ’कोविड-19’ म्हणून राखीव ठेवलेल्या मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात प्रसूतीसाठी पाठवले होते, परंतु या रुग्णालयात पर्सनल प्रिकॉशन घेणारे पीपी कीट नसल्यामुळे या महिलेला सेंट जॉर्ज रुग्णालय व्यवस्थापनाने पुन्हा वाशी येथील महापालिकेच्या ’कोविड-19’ रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. अखेर तिला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करून सोमवारी शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यात आली. सुरक्षेची सर्व काळजी घेत व्यवस्थित प्रसुती पार पडण्यासाठी नियोजन करणारे प्रसुतीतज्ज्ञ डॉ. राजेश म्हात्रे, भूलतज्ज्ञ डॉ. चैताली, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुषमा तायडे आणि वाशी रुग्णालयातील सर्व सहकार्यांचे महापालिका आयुक्तांनी अभिनंदन केले.
कोविड रुग्णालय सर्व सुविधांनी सज्ज
कोरोनाची लागण झालेल्या महिलेची यशस्वी प्रसुती सर्वप्रथम एम्स रुग्णालयात करण्यात आली होती. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील कोव्हिड रुग्णालयात अशी प्रसुती करण्यात आली. जन्म दिलेल्या बाळाची कोरोना चाचणी पुढील 48 तासांत केली जाणार असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेचे ’कोविड-19’ हे रुग्णालय आता कोरोनाबाधित रुग्णांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांनी सांगितले.