कर्जत ः बातमीदार
माथेरानमधील एका हॉटेलमध्ये पर्यटक म्हणून आलेली 30 वर्षीय आशा रामकुमार लोध (रा. नेहरूनगर, घाटकोपर, मूळची रहिवासी कानपूर) हिने स्वत:वर धारदार चाकूने वार करून घेतल्याने तिला जखमी अवस्थेत असल्यानेे स्थानिक नागरिक सॅबी रीझारीओ यांनी माथेरान पोलिसांना कळविले. उपचारासाठी माथेरान पोलिसांनी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तिला बी. जे. हॉस्पिटल येथे तत्काळ आणले होते.
ही महिला प्रेमभंगामुळे मानसिक तणावाखाली आल्याने तिने आपल्या हातावर दोन-तीन ठिकाणी वार करून आपली रक्तवाहिनी कापून जीवन संपविण्यासाठी प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलीस वर्तवत आहेत.
यापूर्वी तिने आपल्या जन्मदिनी 25 जून रोजीही निराशेतून माथेरान येथे येऊन दरीत उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ती बेशुद्ध झाली व तिच्या पायाला मार लागला होता आणि ती त्या घटनेतून बचावली होती, असे तिने मद्यधुंद अवस्थेत बी. जे. हॉस्पिटलमधील डॉ. उदय तांबे व पोलिसांना उपचार सुरू असताना सांगितले. या पर्यटक महिलेला वाचविण्यासाठी माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सखाराम वागुळे, पोलीस हवालदार महेंद्र राठोड, प्रशांत गायकवाड, ए. के. जोशी, पोलीस शिपाई राहुल पाटील तसेच होमगार्ड मोरे व बुंदे उपस्थित होते.