Breaking News

संचारबंदीमुळे माडी उत्पादक अडचणीत; शासनाने मोकळीक देण्याची मागणी

मुरूड ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जारी असल्याने मुरूड तालुक्यातील माडी व्यवसाय धोक्यात आला आहे. मुरूड तालुक्यातील सर्व माडी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे नैसर्गिक माडी वाया जात आहे. त्याचप्रमाणे कित्ते भंडारी समाजातील तरुणवर्ग काम नसल्याने घरी बसून आहे. त्यामुळे ज्यांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे त्यांचे खूप हाल होत आहेत. 

हाताला काम देणारा व्यवसाय ठप्प पडल्याने असंख्य तरुण बेकार झाले आहेत. माडी विक्री करणार्‍या केंद्रांची संख्या कमी असतानासुद्धा सदरची केंद्रे बंद असल्याने या समाजावर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. रायगड जिल्ह्यात माडी व्यवसायला चांगले दिवस असताना संचारबंदीमुळे हा व्यवसाय पूर्णतः बंद आहे. शासनाने लवकरात लवकर सदर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी असंख्य तरुण करताना दिसत आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना मुरूड तालुका भंडारी बोर्डिंगचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी सांगितले की, माडी ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. शिवाय नैसर्गिक द्रव्य असून आरोग्यास गुणकारी आहे. लॉकडाऊन मुळे गेले कित्येक दिवस हा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने लवकरात लवकर हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. वेळेत झाडावरची माडी काढली नाही तर झाडाला नुकसान होऊन झाड मृत होऊ शकते.तसेच बगायतदारांकडून काही नारळाची झाडे वर्षाच्या कराराने घेतली जातात, परंतु माडी न काढल्याने आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने भंडारी समाजातील तरुणांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply