Breaking News

लॉकडाऊनमध्येही रेड हाऊस खुले; ग्रामपंचायतीकडे नोंद नाही; सोशल डिस्टन्सिंगला हरताळ

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुका फार्म हाऊस आणि रिसॉर्टचा तालुका म्हणून ओळखला जातो. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने बहुतेक रिसॉर्ट्स शासनाने बंद केले आहेत, मात्र कर्जत तालुक्यातील गौरकामत येथे असलेले केतकी बाग आणि रेड हाऊस हे लॉजिंग तसेच बोर्डिंगची सुविधा देणारे रिसॉर्ट्स 24 तास उघडे आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता रिसॉर्ट सुरू असून सध्याच्या

लॉकडाऊनमध्येही तेथे पर्यटक येतात कसे आणि मौजमजा करून पुन्हा जातातच कसे, असा प्रश्न खुद्द ग्रामपंचायतीने उपस्थित केला आहे.

कर्जत तालुक्यातील गौरकामत ग्रामपंचायत हद्दीत केतकी बन सोसायटी असून येथे रेड हाऊस नावाचे एक फार्म हाऊस बांधले गेले आणि आज त्या हाऊसचे रूपांतर रिसॉर्टमध्ये झाले आहे. तेथे व्यायसायिक पर्यटनस्थळ विकसित केल्याचे समोर आले आहे. मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूला, गावापासून आत असणार्‍या फार्म हाऊसमध्ये वर्षभर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देण्यात येतात. हे फार्म हाऊस नेमके कोणाच्या मालकीचे आहे याबाबत संदिग्धता आहे. या फार्म हाऊसमध्ये पर्यटनाशी संबंधित काहीही नाही, पण समोर असलेला ढाकचा डोंगर आणि पावसाळ्यात असलेले धबधबे तसेच राजनाला कालव्यामुळे असलेल्या

वनराईचा फायदा उचलून लॉजिंग आणि हॉटेलिंगचा व्यवसाय चालवला जात आहे.

गौरकामथ ग्रामपंचायतीकडे तेथे सुरू असलेल्या व्यवसायाची कोणतीही नोंद नसल्याचे आढळले आहे.नेहमी तेथे पर्यटकांची वर्दळ सुरू असते आणि याबाबत यापूर्वी अनेकांनी तिथे चालणार्‍या समारंभांबाबत विचारणा केल्यास फॅमिली फ्रेंड आहेत, फॅमिली सेलिब्रेशन आहे, अशी कारणे देत वेळ मारून नेली जात असल्याची माहितीही पुढे येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत शहरांपेक्षा ग्रामीण भागात कमालीची काळजी घेतली जात आहे. गावात बाहेरून आलेला व्यक्ती कोण, कुठून आला याबाबत कसून चौकशी केली जात आहे आणि याचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. गावकरी सतर्क राहिले आहेत म्हणूनच कोरोना गावापासून अद्याप तरी दूरच राहिला आहे, मात्र स्वतःला उच्चशिक्षित म्हणून घेणारे जर नियमांचे उल्लंघन करीत आहेत, तर त्याची शिक्षा संपूर्ण गावाला का, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायत सरपंच तसेच अन्य पदाधिकारी तेथे पोहचले असता रेड हाऊसमध्ये 20हून अधिक पर्यटक एकत्र बसून होते.

येथे अनेक पर्यटक असून ते नेमके किती दिवसांपासून फार्म हाऊसमध्ये मुक्कामास आहेत याबाबतची माहिती समोर येत नाही. संचारबंदीनंतर त्यांचा प्रवास झाला असून लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविला असताना त्यांना प्रवासाचा कोणता परवाना आणि कोणी दिला आहे याचाही शोध ग्रामपंचायत घेत आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनालाही जाऊ देत नाही. या फार्म हाऊसमध्ये नेमके किती लोक वास्तव्यास आहेत याचीही तातडीने शासनाने चौकशी करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

कोणत्याही परवानगीविना हॉटेलिंग आणि लॉजिंगचा व्यवसाय बेकायदेशीर आहे, असे आमचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरी याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा.

-अ‍ॅड. योगेश देशमुख,

सरपंच, गौरकामत ग्रामपंचायत

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply