नवी मुंबई : बातमीदार
मुंबई, पुणे व ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतही कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनदेखील चिंतेत आहे. पालिका व पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे, मात्र असे असले तरी काही नागरिकांकडून हलगर्जीपणा कमी होताना दिसत नसल्याने शिस्तीत घरी थांबून सामाजिक अंतर राखणारे इतर नवी मुंबईकर चिंतेत आहेत. सकाळी काही तास खुल्या करण्यात आलेल्या दुकानांत व विक्रेत्यांकडे खरेदी करण्यात काही नागरिक बेशिस्तपणा दाखवत आहेत. त्यामुळे बाधा होण्याची शक्यता वाढली आहे. यात गावातील अंतर्गत रस्ते आघाडीवर आहेत. येथे मांसाहारी पदार्थ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडू लागली आहे. साक्षात मृत्यू समोर उभा असताना खवय्यांकडून नियमभंग होऊ लागला आहे. नवी मुंबई शहरात 29 गावे आहेत. मुख्य म्हणजे शहरातील लोकसंख्या वाढताना त्याचा परिणाम गावांवरही झाला आहे. गावातील अनेक नागरिकांनी स्वतःला मिळालेल्या भूखंडावर अनेक मजली चाळी उभारल्याने मुंबईतून व परराज्यातून आलेल्या नागरिकांना भाडेतत्त्वावर राहण्यास जागा मिळाल्या आहेत. लोकसंख्या वाढल्याने आपोपाप व्यवसाय व रस्त्यावरील फेरीवालेही वाढले आहेत. सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. त्यातून भारतही सुटलेला नाही. नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिकांकडून मात्र शासनाच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन होऊ लागले आहे.