Tuesday , February 7 2023

खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत

आपत्कालीन मदत करणार्‍यावर कुत्र्याचा हल्ला

खोपोली : प्रतिनिधी

मागील एकदीड महिन्यांपासून खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत सुरू आहे. गुरुवारी (दि.19)ही  शहरातील सहकार नगर  परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने दोघांना  चावा घेऊन जखमी केले. यात मेहमूब जमादार या आपत्कालीन मदत करणार्‍या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकाराचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्याच्या चावा घेऊन एकूण आठ जण जखमी झाले होते. त्यानंतर मागील शुक्रवारीही अशाच पिसाळलेल्या कुत्र्याने तिघांना चावा घेत जायबंदी केले आहे. दरम्यान, पिसाळलेला कुत्रा चावल्याने रेबीज होऊन एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यातच गुरुवारी पुन्हा येथील सहकार नगर परिसरात एक कुत्रा पिसाळलेल्या स्थितीत सैराट बनला. त्याने दोघांना चावा घेऊन जखमी केले. त्यानंतर सदर कुत्र्याला पकडण्यासाठी आपत्कालीन स्थितीत मदत करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. ही मोहीम सुरू असताना सदर पिसाळलेला कुत्रा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार महेबूब जमादार यांना चावला. त्यांना तातडीने नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, हा पिसाळलेला कुत्रा एका टेम्पो खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेचे वृत्त समजल्यानंतर मुख्याधिकारी गणेश शेटे, नगरसेविका प्रमिला सुर्वे यांनी नगरपालिका रुग्णालयात जाऊन जमादार यांची भेट घेतली आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply