मोहोपाडा ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याची काळजी वाटू लागली आहे. हातावर पोट भरणार्यांची अवस्था दोरी तुटलेल्या पतंगासारखी झाली आहे. यातच चांभार्ली हद्दीतील वृंदावन फ्लोरा प्रोजेक्टमधील 260 कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना समजताच त्यांनी पुढाकार घेऊन 260 कामगारांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून दिली. पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या पुढाकाराने फ्लोरा प्रोजेक्टचे मालक अश्विन पटेल यांच्या सहकार्यातून चांभार्ली ग्रामपंचायत व मोहोपाडा व्यापारी असोसिएशन पदाधिकार्यांच्या उपस्थितीत 260 मजुरांना धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वाटपप्रसंगी दीड ते दोन मीटर अंतर ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, सरपंच बाली कातकरी, उपसरपंच दत्तात्रय जांभले, सदस्य उमेश मुंढे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव अमित शहा, जयदत्त भोईर, ग्रामपंचायत सदस्य प्रतिप पाटील, प्रवीण जांभले, विनया मुंढे, राजश्री जांभले, चित्रा मुंढे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप घोरपडे आदी उपस्थित होते.