Breaking News

कासाडी नदी झाली प्रदूषणमुक्त

लॉकडाऊन इफेक्ट; नागरिकांत समाधान

पनवेल ः वार्ताहर

लॉकडाऊनच्या काळात पनवेल तालुक्यातील महत्त्वाची अशी कासाडी नदी स्वच्छ दिसू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव मासेमारी करताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय बंद असल्याचा सकारात्मक परिणाम तळोजा एमआयडीसीमधून वाहणार्‍या कासाडी नदीवर दिसून येत आहे. औद्योगिक प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या कासाडी नदीचे पाणी स्वच्छ झाले आहे. कासाडी नदीत मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याने हे प्रदूषण थांबविण्याासाठी अनेक मोहिमा या ठिकाणी सुरू आहेत. सेव्ह कासाडी, सेव्ह रिव्हर यांच्यासारख्या मोहिमा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सुरू आाहेत. विशेष म्हणजे नदीतील प्रदूषणाविषयी राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे सर्व जग थांबले असताना सर्वत्र प्रदूषणाची पातळी मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभर दूषित पाणी, प्रदूषणामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या कासाडी नदीचे पाणीही स्वच्छ झाले आहे. काळवटपणा तसेच रसायनयुक्त पाण्याऐवजी स्वच्छ पाणी वाहू लागल्याने ते शेती आणि मासेमारीसाठी उपयुक्त ठरू शकते, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. कासाडी नदीचे पाणी थेट कोपरा खाडीत जाऊन मिळत आहे. पाणी अतिशय स्वच्छ असल्याने कोपरा खाडीतील पाणीदेखील काही प्रमाणात स्वच्छ झाले आहे. स्थानिक शेतकरी, मच्छीमार या नदीवर अवलंबून आहेत. आता नदीचे प्रदूषण कमी झाल्याने स्थानिकांना पारंपरिक व्यवसाय करता येणार आहे. प्रशासनाने नदीपात्र कायमस्वरूपी स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply