पनवेल ः प्रतिनिधी
ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने सध्याच्या लॉकडाऊनच्या कालखंडात ’व्हॉट्सअॅप मार्गदर्शन’ या एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात्मक कार्यक्रमात व्हॉट्सअॅप समूह तयार करण्यात आले. त्यावर सलग 14 दिवस विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले. समूहांंमधील नागरिकांनी आपल्या शंका व प्रश्न विचारले. त्यावर या सर्व तज्ज्ञमंडळींनी उत्तरे देत मार्गदर्शन केले. सध्याची ज्वलंत समस्या असलेल्या कोरोनापासून वाचण्यासाठी घ्यावयाची खबरदारी, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, मनोविकार, स्पर्धा परीक्षा, होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा, चित्रकला, मूर्तिकला, हस्तकला, गायन, वादन, शास्त्रीय नृत्य, नाटक, आरोग्यदायी, बुद्धिवर्धक आणि घरी खेळता येणारे मनोरंजनपर खेळ, कविता व कथालेखन, अभिवाचन, पाककला या विषयांबाबत तज्ज्ञांनी तसेच करप्रणाली व सद्यस्थितीमधील गुंतवणूक आदी विषयाबाबतही नामवंत कर सल्लागारांनी मार्गदर्शन केले. ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष शंकर आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, सध्या कोरोनामुळे त्रस्त नागरिक घरी अडकले आहेत. त्यांना मुख्यतः शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची गरज आहे. तसेच त्यांना विविध विषयांचे ज्ञान मिळावे व मनोरंजनही व्हावे, या उद्देशाने नवीन पनवेल ब्राह्मण सभेने या उपक्रमाची निर्मिती केली. ब्राह्मण सभेच्या वतीने रोजगारविहिन नागरिकांना रोख तसेच धान्यरूपाने साह्यही करण्यात आले.