महाड ः प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सातत्याने पाणी योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. आजघडीला महाड तालुक्यात 12 गावे आणि 82 वाड्यांत
पाणीटंचाई असून नऊ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती महाड पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी भूषण जोशी यांनी दिली.
महाड, पोलादपूर तालुक्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक पावसाची नोंद होत असली तरी कोसळणार्या पावसाचे पाणी अडविण्याचे नियोजन नाही. गावागावांतून वनराई बंधारे बांधण्यात आले. विंधन विहिरी, नळ योजना
कार्यान्वित करण्यात आल्या तरीही या दोन तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. गावागावांतून सुरू करण्यात आलेल्या नळ योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च
करण्यात आले, परंतु त्यानंतर नळ योजनेची दुरुस्ती, पाणीपट्टीची वसुली या कारणांमुळे अनेक योजना बंद कराव्या लागल्या आहेत. काही गावांत तर वीज बिल थकविल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात
आल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे.
अशा प्रकारे अनेक कारणांमुळे पाणीटंचाई निर्माण होत असून गाव पातळीवर पाणी नियोजन करणे आवश्यक आहे. महाड तालुक्यात कोथेरी, नागेश्वरी, काळकुंभे, कालवली धारवली या धरणांची कामे अपूर्ण आहेत. वेळेत धरणाची कामे पूर्ण केल्यास काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील धरणाची कामे अपूर्ण आहेत. महाड तालुक्यात सरासरी तीन-साडेतीन हजार मिमी दरवर्षी पावसाची नोंद होते. जूनपासून सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोसळणार्या पावसाने नदीनाले, धरणे तुडूंब भरून जातात. पावसाळ्यात साठवून ठेवण्यात आलेले पाणी फेब्रुवारी, एप्रिलअखेर पुरते, परंतु एप्रिल आणि मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते.
महाड तालुक्यात सापे तर्फे गोवेल गावठण, पिंपळकोंड, फाळकेवाडी, ताम्हाणे, आढी गाव, घुरुपकोंड, शेवते, मूळगाव, गवळवाडी, साकडी आणि पाचाड या गावांत व तालुक्यातील मांडले काळकाईकोंड, पायरीकोंड, आंब्याचा माळ, नारायणवाडी, धनगरवाडी, आदिवासीवाडी, खलाटवाडी,
हुबरी धनगरवाडी, गौळवाडी, तेरडेवाडी, नातोंडी मोहल्ला, सोनारवाडी, गोठेकरवाडी, नातोंडी बौद्धवाडी, कुभार्डे धनगरवाडी, रावतळी मानेधार, दहिवड आदिवासीवाडी, खर्डी पायरी कोंड, बौद्धवाडी, गोंडाळे आदिवासीवाडी, शेडगेकोंड, तळीये खालची वाडी, शिंदेवाडी, म्हस्केवाडी, तळीये बौद्धवाडी, चर्मकारवाडी, तळीये वुैंभेनळी, वाघोली आदिवासीवाडी आदी 82 वाड्यांत पाणीटंचाई भासत आहे. या गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.