पनवेल ः वार्ताहर
लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांचे मोठे हाल होत आहेत. अशा प्राण्यांसाठी पनवेल परिसरातील विविध प्राणीमित्र, व्यक्ती आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या असून त्यांच्यामार्फत दररोज अशा मोकाट मुक्या जनावरांसाठी पाण्यासह दूध व खाद्यपदार्थ सकाळ-संध्याकाळ पुरविले जात आहेत. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आहेत. अशा प्राण्यांचा नेहमीच नागरिकांसह हॉटेल व्यावसायिक व इतर दुकानदारांकडून खाण्या-पिण्याचा प्रश्न सुटत असे, परंतु सध्याच्या लॉकडाऊन काळात सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने या मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. गुराढोरांना मार्केट यार्ड येथील उरलेला भाजीपाला मिळत आहे, परंतु कुत्रे, मांजरी व इतर प्राण्यांचे मात्र सध्या हाल सुरू आहेत. अशांसाठी अनेक प्राणीप्रेमी तसेच सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. त्यांच्यामार्फत त्यांना दिवसा व रात्री अन्न पुरवले जात आहे. जास्तीत जास्त लोकांकडून त्यांना मदत मिळावी यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही मंडळी लोेकांना आवाहन करीत आहेत. त्याचप्रमाणे अनेक जण आपल्या घराच्या गॅलरीत किंवा मोकळ्या जागेत पाण्याची भांडी व धान्य ठेवत असल्याने कावळे, चिमण्या, कबुतरे, खारुताई यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघाला आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या अन्नातील थोडा वाटा या मुक्या जनावरांसाठी काढून ठेवावा व तो त्यांना द्यावा, असे आवाहन प्राणीप्रेमी संस्थेकडून करण्यात येत आहे.