कळंबोली : प्रतिनिधी
चला आता कोरोनाला हरवू असा निर्धार करत पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अनेक तातडीने प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत. पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, पालिकेचे उपायुक्त न शिक्षण विभाग आयु्क्त संजय शिंदे, प्राथमिक शिक्षण विभाग अधिकारी बाबासाहेब चिमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका शिक्षण विभाग कोरोनाच्या लढाईत चांगलाच सक्रिय झाला आहे.
आरोग्य विभागाचे वैद्यकिय अधिकारी, नर्स यांच्यासोबत महानगरपालिकेचे सर्व शिक्षक महानगरपालिका हद्दीत जावून आपले कर्तव्य बजावत आहेत. आतापर्यंत त्यांनी खारघर, कामोठे, तक्का, खांदा कॉलनी, कळंबोली या क्षेत्रात आपली सेवा बजावत असताना या विभागातील अनेक स्वयंसेवी संस्था, समाजसेवक, व सोसायटीच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या कामाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
पनवेल महानगरपालिका हद्दीत बेघर, निराधार, गरजू विस्तपित कामगार आणि गरजू नागरिकांना मदतकार्य अंतर्गत उभारलेल्या निवारा केंद्रात देखील शिक्षण विभागातील शिक्षक आपली सेवा अविरत बजावत आहेत. कोरोनाच्या या लढाईत नागरिकांच्या हितासाठी आम्ही मागे नसून पालिका प्रशासनासोबत या पुढेही या कामात अखंडपणे सेवा देवून कोरोनाला हरवू अशा निर्धार या सर्व शिक्षकांनी व्यक्त केला आहे.