नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दहशतवादप्रकरणी आता गप्प बसणार नाही. खूप झाले. आता सहन करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला आहे. पुलवामा आणि उरी हल्ल्यावर सरकारने कडक कारवाई केली आहे, याची आठवणही मोदींनी करून दिली आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) 50व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. देश आणि औद्योगिक प्रतिष्ठानच्या सुरक्षेचा आधार सांगत पंतप्रधान मोदींनी सीआयएसएफचे कौतुक केले. वैभवशाली भारताच्या निर्माणात आपले अमूल्य योगदान आहे. यात महिलांचेही महत्त्वाचे स्थान आहे. गणवेश परिधान केलेल्या मुलींची संख्या सीआयएसएफमध्ये खूप मोठी आहे. त्यामुळे या मुलींसोबत मी त्यांच्या आईचेही अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले.
गाझियाबादमधील सीआयएसएफ कॅम्पमधील जवानांना संबोधित करताना मोदी म्हणाले, तुमच्या हातात देशाची सुरक्षा आहे. औद्योगिक प्रतिष्ठानची सुरक्षा आहे. कोणत्याही व्हीआयपीला सुरक्षा देण्यापेक्षाही तुमचे काम मोठे आहे. तुम्ही तुमचे काम किती नम्रपणे करतात याचा मी साक्षीदार आहे.
नेपाळ व हैतीमध्ये झालेल्या भूकंपात आपण केलेल्या मदतीची दखल आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली होती. एखादे शेजारी राष्ट्र लढण्यास सक्षम नसेल; तर तो देशातील सुरक्षेला नुकसान पोहचवण्याचे काम करतो. तो म्हणजे दहशतवादाचे दुसरे नाव आहे, असे म्हणत मोदींनी अप्रत्यक्ष पाकला टोला लगावला.