नेरळ पोलिसांची धडक कारवाई; 51 हजारांचे निर्मिती साहित्य नष्ट
कर्जत ः बातमीदार
सर्वत्र लॉकडाऊन आणि त्यात नेरळमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने परिसर ताब्यात घेतला आहे. अशा वेळी नेरळ पोलिसांनी या कामातून वेळ काढत दुर्गम भागात चालविण्यात आलेल्या गावठी दारूभट्ट्यांकडे लक्ष वळवून दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त करीत 51 हजारांचे साहित्य नष्ट केले आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांना खबर्याकडून बेकरे गावच्या जंगलात गावठी दारूभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. नेरळ गावात आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे नेरळ गाव हॉटस्पॉटवर असून नेरळ गावात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे कोणी घराबाहेर पडत नसल्याने नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना काहीशी विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे गावठी दारूभट्ट्या बेकायदेशीररीत्या सुरू असल्याची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे स्वतः आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन जुम्मापट्टी येथील डोंगरातून खाली उतरून जंगलात ओहोळाच्या खाली सुरू असलेली हातभट्टी गाठली. तेथे गावठी हातभट्ट्या सुरू असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे पाहून तेथे असलेल्या व्यक्ती पळून जंगलात गेल्याने पोलिसांच्या हाती कोणीही लागले नाही. त्या ठिकाणी दोन गावठी हातभट्ट्या असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यानंतर सोबत असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी सर्व हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हे दाखल केले असून पोलीस नाईक निलेश वाणी यांनी फिर्याद दिली आहे. या हातभट्ट्या जंगलात असल्याने तेथून कोणतेही साहित्य नेरळ पोलीस ठाणे येथे आणणे शक्य नसल्याने पोलिसांनी दारूभट्ट्या तेथेच उद्ध्वस्त केल्या. पोलिसांनी दोन्ही भट्ट्यांमधील प्लास्टिकचे 20 पिंप आणि त्यात साठवून ठेवलेले गूळमिश्रित 1400 लिटर रसायन तेथेच जमिनीवर ओतून लोखंडी भांडी तोडली. या प्रकरणी चौघांवर बेकायदा गावठी दारूभट्ट्या चालविल्याप्रकरणी मुंबई प्रोव्हिजन अॅक्ट 65 (फ) 83प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस नाईक मुनेश्वर अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, नेरळ पोलिसांनी तब्बल 52 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला असून लॉकडाऊनकाळात अशी कारवाई केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.