पाली : प्रतिनिधी
नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या घरापासून शहरात जाऊन राहिलेला तरुण वर्ग कोरोनामुळे आपल्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. अशाच प्रकारे जंगलभागातून पायपीट करून तळकोकणात आपल्या मूळ गावी परतणार्या 11 तरुणांना जांभुळपाडा येथील तपासणी नाक्यावर रोखण्यात आले. त्यांना क्वारंटाइन करण्याचे आदेश सुधागडच्या तहसीलदारांनी दिले आहेत.
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा हद्दीत करचुंडे येथील तपासणी नाक्यावर कार्यरत असणारे शिक्षक वेत्रवान गुरव, दत्ता सावंत व शरद निकुंभ यांनी या 11 जणांच्या पायी चालणार्या तरुणांना अडवून चौकशी केली असता, ते नेरळ, कर्जत, खोपोलीमार्गे जंगलातून वाट काढत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पायी जात असल्याचे समोर आले.
या वेळी तपासणी पथकातील सदस्यांनी जंगलातून आपले सामान सोबत घेऊन चालून थकलेल्या या तरुणांना घाबरून नका असे सांगून त्यांना सावलीत बसवले. रास्तभाव दुकानदार विशाल गुरव व मयुर गुरव यांनी तातडीने त्यांच्यासाठी पाणी व नाश्त्याची सोय केली.
याबाबत सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांना खबर देण्यात आली. त्यांनी या सर्वांना क्वारंटाइन करण्यासंबंधी भूमिका घेत तसे आदेश दिले. या तरुणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, बल्लाळेश्वर भक्तनिवासात राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, जांभूळपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …