Breaking News

मांडवा जेटी रस्त्यालगत आग; संभाव्य मोठी हानी टळली

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील मांडवा जेटीजवळील रिलायन्स कंपनीच्या गॅस स्टेशननजीक सोमवारी (दि. 18) लागलेली आग त्वरित विझविण्यात थळ येथील आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दल जवानांना यश आल्याने संभाव्य मोठी हानी टाळता आली.

सोमवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मांडवा जेटी रस्त्यालगत रिलायन्स कंपनीच्या गॅस स्टेशन जवळ मोठी आग लागल्याची सूचना आरसीएफ थळच्या अग्निशमन केंद्रास प्राप्त झाली. त्याचसोबत रिलायन्स, नागोठणे येथील जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी आरसीएफ जनसंपर्क विभागाकडे आरसीएफ थळच्या अग्निशमन दलाच्या मदतीसाठी दूरध्वनीवरून  विनंती केली. घटनेची गांभीर्याने दखल घेत, आरसीएफ प्रशासनाने अग्निशमन बंब आणि कर्मचारी त्वरित रवाना केले.  अवघ्या 20 मिनिटात आरसीएफ थळचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि वरिष्ठ अग्निशमन अधिकारी विष्णू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हनिफ कुरेशी, हरिश्चंद्र बावकर, तुषार कवळे, विशाल मंडलिक, अतुल ठाकूर या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन-तीन एकर जमिनीवर पसरलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, रिलायन्सचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि आग पूर्णत: विझविण्यात आली.

रिलायन्स कंपनीला गॅस पुरवठा करणार्‍या पाइपलाईन्स आणि वाल्व स्टेशन जवळच असल्याने ही आग पसरू न देणे गरजेचे होते. आरसीएफ थळच्या अग्निशमन दल जवानांची तत्परता आणि शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply