Breaking News

शेकडो नागरिक नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर; कर्जतमध्ये कोरोना शिरकावाची भीती; प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील जवळपास 650 नागरिक नोकरीनिमित्त दररोज कर्जतबाहेर पडून नवी मुंबई परिसर, ठाणे जिल्हा आणि मुंबई शहरात जात आहेत. ते अत्यावश्यक सेवा म्हणून कर्जत तालुक्यातून दररोज बाहेर पडून सायंकाळी-रात्री परततात. त्यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो अशी भीती असल्याने प्रशासनाने त्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा आपल्या घरी राहण्याची बंधने घालण्याची मागणी कर्जत तालुक्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.

कर्जत तालुक्यात यापूर्वी कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण हा ठाणे दिघा येथे नोकरीनिमित्त जाऊन पुन्हा घरी परत येत असल्याने आढळला होता.त्यानंतर प्रशासनाने बाहेरच्या जिल्ह्यात जाणार्‍या जिल्हा सीमा बंद करण्याचे ठरवले होते, मात्र तरीही कर्जत तालुक्याचा ग्रामीण भाग आणि कर्जत शहर यांचा विचार करता दररोज कर्जतमधून बाहेर जाण्याचे प्रमाण काही थांबले नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या 52 ग्रामपंचायतींमधून तब्बल 550च्या आसपास तरुण हे ठाणे जिल्हा तसेच मुंबईत जातात, तर कर्जत नगरपालिका हद्दीमधील नोकरी किंवा अन्य अत्यावश्यक बाबींसाठी बाहेर पडणार्‍यांची संख्या 100हून अधिक आहे. कर्जतमधून बाहेर जाणारे हे रेल्वेची नोकरी, बँकेची नोकरी असे अत्यावश्यक सेवेचे कारण पुढे करून दररोज तालुक्याबाहेर जात आहेत, तर दूध घेऊन कल्याणपर्यंत जाणार्‍या दुचाकीही मोठ्या प्रमाणात असून शेलू येथील जिल्हा हद्द ओलांडून या दुचाकी दररोज पहाटेच्या अंधारात कर्जत सोडून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करतात.

सध्या ठाणे जिल्ह्यात आणि पनवेल, नवी मुंबईत कोरोनाचा कहर सुरू असून त्या भागात जाणे बंद असताना अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कर्जतमधील 650 लोक वेगवेगळी कारणे पुढे करून जात आहेत. त्यांचे जाणे रोखण्याची गरज निर्माण झाली असून कर्जत तालुक्यात एकदा आलेला कोरोना पुन्हा येऊ नये आणि त्याच्या विषाणूंचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यात रेल्वे कर्मचार्‍यांसाठी कल्याण ते लोणावळादरम्यान गाडी धावत असून ती गाडी कर्मचार्‍यांची ने-आण करते, पण कल्याण येथून ते कर्मचारी बसने मुंबईपर्यंत पोहचत आहेत. ही बाब निश्चितच गंभीर असून कर्जतची हद्द ओलांडून पनवेल आणि ठाणे जिल्ह्यात जाणार्‍यांना प्रशासनाने अटकाव करावा, अशी मागणी होत आहे.            

आमच्या कार्यालयाकडे कर्जतमधील ग्रामीण भाग आणि कर्जत शहर येथील दररोज तालुक्याबाहेर जाणार्‍यांची यादी आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर व शहरी भागात पालिकेने ती यादी तयार केली असून मोठ्या संख्येने तालुक्याबाहेर जाऊन पुन्हा येणार्‍यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply