Breaking News

पनवेलमध्ये रुग्णसंख्या वाढतीच

डॉक्टर, पोलिसासह 11 नवे रुग्ण

नवेल : प्रतिनिधी
पनवेलच्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीणमध्येही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ग्रामीण भागात बुधवारी (दि. 6) विचुंबे येथील तीन वर्षांच्या मुलीसह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यात एका डॉक्टरचा समावेश आहे, तर महापालिका क्षेत्रात कामोठे आणि खारघरमध्ये प्रत्येकी तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये मुंबई पोलीस दलातील एक उपनिरीक्षक आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 113 रुग्ण झाले असून, तालुक्यातील संख्या 145 झाली आहे. त्याचबरोबर महाडमधील नवा रुग्ण मिळून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 167 वर पोहोचला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर 35 ई येथील जायनी सोसायटीतील 46 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तिच्या पती आणि मुलाला या अगोदरच कोरोनाची लागण झालेली आहे. खारघर सेक्टर 10मधील कोपरा गावात कोरोनाग्रस्त आढळलेली 41 वर्षीय व्यक्ती एपीएमसी मार्केटमध्ये टेम्पोचालक आहे. त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. सेक्टर 13 मधील बालाजी हाईतमधील 42 वर्षीय व्यक्ती डायलेसिसकरिता सानपाडा येथील सूरज हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्या ठिकाणी तिला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोठे सेक्टर 14मधील मीरा प्रभू निवासात राहणार्‍या 46 वर्षीय व्यक्तीला लागण झाली आहे. ही व्यक्ती गोवंडी आगारात बेस्ट चालक असून, कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. सेक्टर 25मधील स्काय गोल्ड अपार्टमेंटमध्ये रहाणार्‍या वडाळा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला कोरोनाचा संसर्ग झाला. आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. सेक्टर 18मधील सिल्व्हर पार्क 58 वर्षीय व्यक्ती वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये काम करते. त्या ठिकाणच्या कार्यालयीन प्रमुखाला कोरोना झाला असल्याने त्यापासून या व्यक्तीला संसर्ग झाला असावा. बुधवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील 1217 जणांची टेस्ट केली गेली आहे. त्यापैकी 11  जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी 70 जणांवर उपचार सुरू असून 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये बुधवारी पाच नवीन रुग्ण आढळले. त्यात उसर्लीमधील एका 30 वर्षीय  महिलेला कोरोनाची बाधा झाली असून, ती एनजीओतर्फे गोवंडी भागात स्क्रिनिंगचे काम करीत होती. विचुंबे येथील  ॐकार पार्कमधील तीन वर्षांच्या मुलीला कोरोनाने ग्रासले आहे. यापूर्वी तिच्या आई-वडिलांसह घरातील तिघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. डेल्टा टॉवर सेक्टर 8मधील रखवालदारचे काम करणार्‍या 31 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. आकुर्ली येथील पनवेल पॅराडाईजमध्ये राहणार्‍या व बीव्हीजी रुग्णवाहिका सेवेचे जिल्हा व्यवस्थापक असलेल्या व्यक्तीला कोरोना झाला आहे. उलवे नोड सेक्टर 5 येथील विन्हस अर्चिडमधील मुंबईला रुग्णवाहिका डॉक्टर असलेल्या 32 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये 134 जणांची तपासणी करण्यात आली असून, सहा जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत, तर 32 रुग्णांपैकी पाच जण बरे झाले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply