पनवेल : बातमीदार
लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या मसाला कुटण्याच्या चक्क्या आता काही वेळेसाठी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महिलावर्गाची मसाला बनविण्याची सध्या लगबग आहे. उन्हाच्या झळ लागायला सुरुवात झाली की महिलांकडून मसाला बनवण्याची तयारी सुरू होते. दररोजच्या जेवणासाठी लाल मसाला हा प्रत्येकाच्या घरात लागतोच. प्रत्येकाच्या मसाला बनवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. सुका मसाला, लाल मसाला, घाटी मसाला, गोडा मसाला, आगरी-कोळी मसाला असे या मसाल्याचे प्रकार आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मसाला बनवून घेतात, सोबतच कुरडया, पापड, लोणचे घालण्याची लगबग घरोघरी सुरू असते, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने मसाल्याचे साहित्य मिळण्याची दुकाने आणि मसाला कुटून देणार्या चक्क्या बंद होत्या. त्यामुळे एप्रिल संपून अर्धा मे महिना संपायला आला तरी महिलांना घरगुती वापराचा मसाला तयार करता आला नाही. आता बहुतांश दुकानात लाल मिरच्या मसाल्याचे साहित्य, अख्खा गरम मसाला उपलब्ध झाला आहे. मसाला कुटून देणार्या चक्क्याही सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग गर्दीतून होऊ नये, यासाठी सकाळी 8 ते दुपारी 11 या वेळेतच चक्क्यांमध्ये मसाला कुटून देण्यात येत आहे. या वेळेत महिला मसाला कुटून घेत येत आहेत. या वर्षी मिरच्यांच्या दरात नेहमीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सर्वसाधारण मिरचीचे दर 200 ते 250 रुपये किलोच्या घरात होते. या वर्षी मात्र लाल मिरच्यांचा दर 250 ते 450 रुपये किलोच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे अनेक महिलांना मसाला तयार करताना आपला हात आखडता घ्यावा लागत आहे. पाच किलो मसाला तयार करणार्या महिला दोन ते तीन किलो मसाला बनवून घेऊन जात आहेत.