कर्जत ः बातमीदार
नेरळ या मोठ्या लोकवस्तीच्या आणि शहरीकरणाकडे झुकलेल्या गावात कचरा ही मोठी समस्या बनली आहे. अशातच नेरळ गावाची शान समजल्या जाणार्या गणेश घाटाच्या खाली आता नवीन कचरा डेपो बनविण्यात आला आहे.
नेरळमध्ये झालेल्या नागरीकरणाबरोबर समस्यादेखील मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. यात साठून राहणारा कचरा आणि त्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उभारण्याची मागणी आहे. त्यासाठी जागादेखील निश्चित करण्यात आली आहे, मात्र आठ वर्षांत ग्रामपंचायत त्या ठिकाणी कचरा डेपो हलवू शकली नाही.
कल्याण-कर्जत मार्गावर असलेल्या जुन्या कचरा डेपोमुळे तेथील नाला अर्धा त्या कचर्याने गिळंकृत केला आहे. दरवर्षी पावसात त्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याबरोबर जुना कचरा वाहून जात असतो आणि पुन्हा त्या ठिकाणी नवीन कचरा पाण्यासोबत वाहून गेलेल्या कचर्यातून अधिक प्रमाणात आणून टाकला जातो. गावातील जुना कचरा डेपो भरून वाहू लागल्याने आरोग्य विभागाने नवीन कचरा डेपो निर्माण केला आहे.
आता मोहाचीवाडी रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या खाली ग्रामपंचायत कर्मचारी कचरा नेऊन टाकत आहेत. त्या पुलाच्या बाजूने मोहाचीवाडी तसेच काही आदिवासी वाड्यांना जाणारा रस्ता असून तेथून प्रवास करताना तोंडावर रूमाल लावून लोकांना जावे लागत आहे. या नव्याने तयार झालेल्या कचरा डेपोमुळे नेरळमधील पर्यटनाचे ठिकाण म्हणून समजल्या जाणार्या गणेश घाट आणि ब्रिटिशकालीन धरण येथील पर्यटन थांबले आहे.
नेरळ गावातील जुन्या कचरा डेपोमध्ये कचरा घेऊन जाणारा टेम्पो जात नाही आणि त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पुलाजवळ कचरा टाकला जात आहे. पूर्व भागात असलेल्या कचरा डेपोपर्यंत पावसाळ्यात वाहने जात नाहीत आणि त्यामुळे पावसाळ्यात जुन्या कचरा डेपो येथेच कचरा टाकून द्यावा लागत आहे. पावसाळा कमी होताच कचरा पुन्हा पूर्व भागातील डेपोपर्यंत नेला जात होता.
आता नव्याने धरणाजवळील नवीन पुलाच्या खाली कचरा टाकला जात आहे, मात्र त्यामुळे पलीकडील भागात मोठ्या प्रमाणात राहणारे आदिवासी लोक आणि परिसरातील शाळेचे विद्यार्थी यांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. त्याचवेळी स्मशानभूमीत येणार्या मंडळींनादेखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तेथील कचरा तत्काळ उचलावा, अशी मागणी आहे.