पनवेल : वार्ताहर
खारघर वसाहत परिसरात राहणारे परप्रांतिय बाराशे कामगार हे आपल्या उत्तरप्रदेश व झारखंड येथील मूळ गावी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांना पनवेल रेल्वे स्थानकातून रवाना करण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमुळे खारघर परिसरात, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश आदी विविध भागात काम करणारे कामगार अडकून पडले होते. गेल्या पावणे दोन महिन्यांपासून त्यांच्या हाताला काम नसल्याने व भविष्यातही काम मिळण्याची आशा नसल्याने त्यांना गावी जाण्याची ओढ लागली होती. केंद्र सरकारने 3 मे पासून टप्पाटप्प्याने राज्य, परराज्यातील मजूरांना गावी जाण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित कामगारांनी खारघर पोलीस ठाण्यात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून या कामगारांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले आहे.
कळंबोलीतून 225 मजुरांची मूळगावी पाठवण
पनवेल : वार्ताहर, कळंबोली : प्रतिनिधी
सव्वा दोनशे मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यात कळंबोली पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली असून या बद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत. कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सव्वादोनशे मजुरांना मध्यप्रदेश येथे आपल्या मूळगावी पाठवण्यात आले. पोलीस ठाण्यातून संबंधितांना बसेसमधून रेल्वेस्थानकावर नेण्यात आले. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या या मध्यप्रदेशमधील नागरिकांनी कळंबोली पोलिसांचे आभार मानले. या सर्वांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त अशोक दूधे, पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांनी नियोजन केले. त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये या सर्वांची पोलिसांनी काळजी घेतली त्यांना जेवणापासून अत्यावश्यक सुविधा पुरवण्यात आल्या. या मजुरांची कोणतीही गैरसोय होऊ दिली नाही.
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण
पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरात असलेल्या पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने सावधानगीरी म्हणून संपूर्ण पोलीस ठाणे गुरुवारी (दि. 14) निर्जंतुकीकरण करून घेण्यात आले. त्याचप्रमाणे या कर्मचार्याच्या सानिर्ध्यात आलेल्या इतर काही कर्मचार्यांचीसुद्धा आरोग्य तपासणी करून घेण्यात आली. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असताना हा कर्मचारी कामोठे वसाहतीत राहणार असून तो मारूतीधाम सोसायटीमधील नातेवाईकांच्या मेडीकल स्टोअरमध्ये बसायला जात होता. या सोसायटीत या पूर्वीच दोन व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आल्या होत्या. त्यांच्या संपर्कातून त्याला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निकष आहे. दरम्यान, हे कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने व पोलीस ठाण्यातच कोरोनाचा शिरकाव झाल्याने इतर अधिकारी व कर्मचार्यांमध्ये सध्या भीतीयुक्त वातावऱण आहे. तक्रारदार तसेच परराज्यात किंवा परगावी जाण्यासाठी परवानगी व कागदपत्रांसाठी येणार्या नागरिकांची आता विशेष काळजी घेतली जात आहे.
शेडुंग टोलनाका येथून 22 हजारांचे मद्य जप्त
पनवेल : रामप्रहर वृत्त
शेडुंग टोलनाका येथे नाकाबंदी बंदोबस्त दरम्यान तालुका पोलिसांनी 22 हजार रुपयांचे मद्य जप्त केले असून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तालुका पोलीस स्टेशनचे हद्दीत शेडुंग टोलनाका येथे नाकाबंदी बंदोबस्त नेमन्यात आलेला आहे. या वेळी पांढर्या रंगाची वँगनर कार (क्र. एम एच 04 डीएन 9901) ही आली तेव्हा या गाडीस पोलिसांनी अडवुन गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले असता त्यांना 22 हजार 208 रुपयांचे मद्य सापडले. पोलिसांनी 22 हजारचे मद्य आणि 2 लाखाची कार जप्त केली आहे. आरोपी दिनेश आनंदा सोनार (48 वर्षे, कलवा जि. ठाणे), आणि दिलीप नामदेव म्हात्रे (51 वर्षे, कळवा) यांच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.