Breaking News

नेरळमधील महिला कोरोना पॉझिटिव्ह

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत परंतु दहिवली पुलाजवळ असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये राहणार्‍या 63 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गेली काही दिवस ही महिला बदलापूरमधील एका खासगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल होती. दरम्यान, आता त्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असून कर्जत तालुक्यातील त्या पाचव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

नेरळ-कळंब रस्त्यावर उल्हासनदीवरील दहिवली पुलाच्या अलीकडे असलेल्या नेरळ विद्या भवन शाळेसमोर एक फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसमध्ये एक कुटुंब राहत असून त्या कुटुंबातील एक 63 वर्षीय महिला दम्याचा त्रास असल्याने 11 मे रोजी नेरळ गावात असलेल्या खासगी दवाखान्यात उपचार घेत होती. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्या महिलेला बदलापूर येथील वैष्णवी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे उपचार घेत असताना त्यांची कोरोना त्रस्त थायरो केअरकडून करून घेण्यात आली होती. त्या टेस्टचा अहवाल प्राप्त झाला असून 63 वर्षीय महिलेला कोरोना झाला असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट निघाल्याने बदलापूर मधून त्या महिलेला आता कोविड

रुग्णालयात हलविले आहे.

सोमवारी दुपारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट मिळाल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्या फार्म हाऊसची माहिती घेण्यात आली.तसेच आरोग्य पथकाने त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात घरातून रुग्णालयात नेल्यापासून अगदी जवळच्या संपर्कात आलेल्या 23 जणांची यादी आरोग्य विभागाने तयार केली असून त्यांच्या कोरोना टेस्ट

घेतल्या जाणार आहेत.

त्याचवेळी प्रशासनाकडून परिसर कोरोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्ण या धामोते गावाच्या हद्दीमध्ये एका फार्म हाऊसमध्ये राहत असून तेथे आजूबाजूला कोणतेही घर नाही. फार्म हाऊसच्या समोरून नेरळ-कळंब हा राज्यमार्ग रस्ता असून नेरळ विद्या भवन शाळेच्या समोर तो फार्म हाऊस असून शाळा देखील लॉकडाऊनपासून बंद आहे.

या नवीन रुग्णाच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील हा पाचवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. कर्जत तालुक्यातील अन्य तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर एक रुग्ण अन्य आजारांसह कोरोना झाल्याने मृत झाला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply