Breaking News

‘रोटरी’ने विकसित केलेल्या उद्यानाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने येथील उरण रोडच्या बाजूला घनदाट जंगल प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर ‘रोटरी‘ने उद्यानही विकसित केले आहे. घनदाट जंगल प्रकल्पाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्याने या उद्यानाचे लोकार्पण सोमवारी (दि.25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, प्रकल्प संयोजक तथा ‘रोटरी’चे माजी प्रांतपाल डॉ.गिरीश गुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील वर्षी रोटरी क्लबच्या वतीने घनदाट जंगल प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाची संकल्पना पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते रोटेरियन परेश ठाकूर यांची असून ‘रोटरी’चे माजी प्रांतपाल डॉक्टर गिरीश गुणे प्रकल्पाचे संयोजक आहेत. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांसाठी उद्यान विकसित करण्यात आले. लहान मुलांसाठी खेळणी,जॉगिंग ट्रॅक, शोभिवंत फुलझाडे, उत्तम प्रकाश योजना यामुळे हे उद्यान पनवेलकरांच्या हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण बनणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रोटरी क्लबने पूर्ण केलेल्या या दोन्ही प्रकल्पांची मुक्तकंठाने प्रशंसा केली तसेच आगामी काळात कुठलेही सहकार्य लागल्यास ते देण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी असेन, असे आश्वासन दिले.
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अमोद दिवेकर, डॉ. अभय गुरसळे, लक्ष्मण पाटील आणि रतन खारोल हे आहेत.
घनदाट जंगल प्रकल्प प्रथम वर्धापन दिन सोहळ्यासाठी आणि उद्यान लोकार्पण कार्यक्रमासाठी उद्योजक जे.एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना (उबाठा) रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ‘टीआयपीएल’चे संचालक अमोघ ठाकूर, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रशांत देशमुख, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे सदस्य, प्रकल्प समितीचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply