पुणे ः प्रतिनिधी
जमीन कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्याच्या आयुक्तांनी लता मंगेशकर फाऊंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. कमीत कमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा करार दीनानथ मंगेशकर रुग्णालयाने मोडला असल्याची तक्रार रमेश धर्मावत यांनी दाखल केली आहे.
काही वर्षांपूर्वी 99 एकर जमीन मंगेशकर फाऊंडेशनने सरकारकडून केवळ एक रुपया किंमत मोजून लीजवर घेतली होती. या जमिनीवर उभ्या राहणार्या रुग्णालयामध्ये कमीत कमी दरात वैद्यकीय सुविधा दिल्या जातील, असा करार या वेळी करण्यात आला होता. या करारानुसार त्यांच्याकडून कारभार होणे सरकारला अपेक्षित होते. या करारानुसार केवळ 20 रुपयांत रुग्णाचे वैद्यकीय चेकअप करण्यात येईल, असे वचन या वेळी देण्यात आले होते, पण वास्तवात मात्र चेकअपसाठी 600 रुपये आकारले जात आहेत. ही सरकारची फसवणूक आणि गरिबांची लूट आहे, असा आरोप रमेश धर्मावत यांनी केला आहे, तसेच कॅन्टीनसाठी देण्यात आलेली जागाही मंगेशकर फाऊंडेशनने भाडेतत्त्वावर दिली आहे. याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि लता मंगेशकर फाऊंडेशनला नोटीस बजावण्यात आली आहे. जर त्यांनी ठरावीक कालावधीत या नोटीसला समाधानकारक उत्तर दिले नाही, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याच्या मनपा आयुक्तांनी दिला आहे. दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. करारातील कोणत्याही कलमांचे उल्लंघन आम्ही केले नाही. आम्हाला नोटीस मिळाली असून आम्ही लवकरच त्याचे समाधानकारक उत्तर देऊ, असे स्पष्टीकरण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दिले आहे.