अहमदनगर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे़ जिल्ह्यातील 25 हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून, यातील 9 हजार जणांना पोलिसांनी आतापर्यंत नोटीस पाठविली आहे़ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 10 हजार जणांना निवडणूक काळात हद्दपार केले जाणार आहे़ पोलीस ठाणेनिहाय तयार झालेली गुन्हेगारांची यादी येत्या काही दिवसांतच हद्दपारीसाठी प्रांताधिकार्यांकडे पाठविण्यात येणार आहे़ केडगाव हत्याकांडाची पार्श्वभूमी लक्षात घेता लोकसभा निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे़ तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते़ ही यादी तयार झाली असून, पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया सुरू आहे़ हाणामारी, खून, अवैध व्यवसाय, दंगल करणे, संघटित गुन्हेगारी, अपहरण, गौणखनिज तस्करी आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्यांवर हद्दपारी व इतर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे़ पोलीस व महसूल प्रशासनाने रमजान, गणेशोत्सव, अहमदनगर महापालिका निवडणूक व श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीदरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हद्दपार केले होते़ याच पद्धतीने आताही कारवाईची मोहीम जोरात राबविण्यात येणार आहे.
Check Also
सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …