Sunday , September 24 2023

‘जवानांचे बलिदान देश विसरला नाही’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या शौर्याला देश कधी विसरणार नाही आणि विसरूही देणार नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) 80व्या वर्धापन दिनानिमित्त हरियाणातील गुरुग्राम येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

या वेळी डोवाल यांनी सीआरपीएफचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगताना म्हटले की, अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असते. दुसर्‍या जागतिक युद्धानंतर 37 देश असे होते जे उद्ध्वस्त झाले आणि आपले सार्वभौमत्व गमावून बसले. यामधील 28 देशांचे कारण त्यांचा देशांतर्गत संघर्ष हे होते. देश दुबळा असतो कारण त्याची अंतर्गत सुरक्षा कमजोर असते. त्यामुळे याची जबाबदारी सीआरपीएफवर येते.

या वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारताच्या फाळणीवेळी सीआरपीएफच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, कदाचित लोक विसरले असतील की, भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर खूपच कमी संख्या असतानाही सीआरपीएफने सुरक्षेच्या दृष्टीने जी महत्त्वाची भूमिका निभावली त्यावर एक पुस्तक लिहिले जाऊ शकेल. डोवाल म्हणाले की, सीआरपीएफच्या गणवेशाशी आणि भारताच्या सुरक्षेशी मी 51 वर्षांपासून जोडलो गेलो आहे. यापैकी 37 वर्षे मी पोलीस खात्याचा भाग होतो. मला लष्कर आणि पोलिसांसोबत काम करण्याची संधी मिळाली, मात्र आपल्या बलाची काही वैशिष्ट्ये आहेत. हेच एक बल आहे ज्यामध्ये इतकी विविधता आहे. व्हीआयपी सुरक्षा, दहशतवाद, कठीण भागात कर्तव्य बजावणे तसेच ईशान्य भारताच्या आव्हानांसह ज्या ज्या ठिकाणी गरज पडली तिथे सीआरपीएफने महत्त्वाचे योगदान दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply