पेण ः प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात समुद्री मासेमारीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वाहतुकीच्या निर्बंधांमुळे खवय्यांचा हिरमोड होत आहे, मात्र उन्हाळ्यामुळे लहान-मोठ्या नद्या, ओहोळांमध्ये पाणी कमी झाल्याने गोड्या पाण्यातील मासे मुबलक प्रमाणात मिळत आहेत. नद्या व खाडीत बोईट, खरवी, चिंबोरी, निवटी, काळेटे, शिवडे, मळे, कोलंबी, मळ्याचे मासे, चिवणी मोठ्या प्रमाणात मिळतात. उन्हाळ्यामुळे महिनाभर नदी-नाल्यातील पाणी आटल्याने तालुक्यातील मच्छीमार मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत असून बाजारात या माशांना चांगली मागणी आहे. त्याबरोबरच शेततळ्यातील कटला, रुई, सायप्रिस, जिताडा, फंटूस, मुरगल व इतर जातीच्या माशांनाही मोठी मागणी आहे. अत्यंत चविष्ट असणारे हे मासे खवय्यांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.
पावसाळा जवळ आल्याने माशांमध्ये गाभोळी तयार झाली आहेत. पहिल्या पावसात वलगणीसाठी मासे तयार असून गाभोळीयुक्त मासे खायला चवदार लागतात. त्यामुळे या दिवसांत मळ्याच्या व शिवडीच्या माशांना खास मागणी असते. त्यामुळेही मळ्याच्या माशांचे भाव चढले आहेत. 200 ते 400 रुपये किलोने हे मासे विकले जात आहेत. लॉकडाऊनमुळे काही दिवस मंद असलेला हा रोजगार पुन्हा सुरू झाल्याने मच्छीमार बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.