धाटाव : प्रतिनिधी
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रोहा डायकेम कंपनीत 7 जून रोजी गोदामाला लागलेली भीषण आग व त्यामुळे झालेल्या स्फोटात प्रयाग हशा डोलकर (रा. खारापटी, वय 32) हा कामगार गंभीररित्या जखमी झाला होता. ऐरोली येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप कामगाराचा जीव गेला असून या कामगाराच्या परिवाराच्या पाठिशी आम्ही सदैव उभे राहू. कंपनीने प्रयाग डोलकरच्या परिवाराला भरपाई दिली पाहिजे तसेच कंपनीतील संबंधितांवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस राजेश डाके यांनी केली आहे, तर धाटाव एमआयडीसीतील कामगार व आजूबाजूला राहणार्या लोकांच्या दृष्टीने सुरक्षेविषयीचा मुद्दा आगामी अधिवेशनात उपस्थित करू, असे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
या संदर्भात फॅक्टरी इन्स्पेक्टर केशव केंद्रे यांनी सांगितले की, रोहा डायकेम कंपनीत 7 जून रोजी झालेल्या दुर्घटनेतील जखमी कामगाराचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला जबाबदार म्हणून कंपनीची पूर्णपणे चौकशी केली जाईल आणि पुढच्या काही दिवसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल.
Check Also
कुष्ठपीडितांच्या मी नेहमी पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या समाजाला पद्मश्री राम नाईक यांच्यासारखे एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे. …