उरण ः प्रतिनिधी
उरण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने अंदाजे 70 लाखांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे कित्येक घरांचे नुकसान झाले असून, शेतकर्यांच्या फळबागा, भाजीपाला पिकाचेही प्रचंड नुकसान झाले. त्याचप्रमाणे विजेचे पोल, झाडे उन्मळून पडली. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून उरण तालुक्यात अंदाजे 70 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.
उरण तालुक्यात 1718 घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. 159 विजेचे पोल, लहान मोठी 127 झाडे, 125 शेतकर्यांच्या फळबागा, भाजीपाला पीक आदींचे नुकसान आले आहे. नुकसान झालेल्या जागेचे गुरुवार ते रविवारपर्यंत पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. याकामी उरण तहसील कार्यालयातील 17 तलाठी, 17 ग्रामसेवक, 16 कृषी सहाय्यक व मंडळ अधिकारी अशा एकूण 50 अधिकारी-कर्मचार्यांनी पंचनामे करून अहवाल तयार केला. तो अहवाल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
नुकसान झालेल्यांना लवकरच नुकसानभरपाई देण्यात येईल. झालेल्या नुकसानीबाबत पाहणी करण्यासाठी पनवेल उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, उरणचे निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे तसेच कर्मचारी उपस्थित होते. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना लवकरच नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.