उरण ः प्रतिनिधी
विश्व पर्यावरण दिनी मंगळवारी (दि. 9) जेएनपीटीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत करंज, जांभूळ, अर्जुन, कदंब, कडुनिंब आणि गुलमोहर यांसारख्या स्थानिक प्रजातींची 1000 रोपे लावण्यात आली. या वेळी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ, भा. रा. से. विभागाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जेएनपीटीने पर्यावरण संवर्धन व ग्रीन पोर्टसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. उदा: चार एमएलडीचा मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प, बंदर प्रचालन क्षेत्रात ये-जा करण्यासाठी इलेक्ट्रिक कार्ट, टग्स/पोर्ट क्राफ्टसाठी शोर पॉवर सप्लाय, तसेच घाटावर ई-टॉयलेट्स सुरू केले आहेत. जेएनपीटीने आपल्या सार्वजनिक इमारतींच्या छतांवर सुमारे 822 किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेलदेखील स्थापित केले आहेत. त्यामधून दरमहा सुमारे 80000 युनिट्सची विद्युत निर्मिती होते. त्याचबरोबर ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी आणि कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी बंदर क्षेत्रात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त बंदरांच्या गुणवत्तेची आणि आरोग्याच्या विविध बाबींविषयी; ज्यात पर्यावरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, जागरूकता वाढवण्यासाठी जेएनपीटी नियमितपणे चर्चासत्र आणि ज्ञानसत्रांचे आयोजन करते.
जेएनपीटीद्वारा सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांबद्दल बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, प्रत्येक व्यावसायिक आस्थापनेसाठी पर्यावरणासंबंधी आपल्या जबाबदार्या पूर्ण करणे महत्त्वाचे असते. जेएनपीटीमध्ये आम्ही ग्रीन पोर्ट बनण्यासाठी सतत पर्यावरण अनुकूल पर्याय शोधतो. भविष्यातही आम्ही पर्यावरण संवर्धनासाठी वचनबद्ध आहोत. पर्यावरण व्यवस्थापन आणि निरीक्षण योजनेचा एक भाग म्हणून जेएनपीटी नियमितपणे पर्यावरणाचे निरीक्षण करते. ज्यामध्ये आयआयटी मद्रासद्वारे वातावरणातील हवा, समुद्राचे पाणी, सागरी पर्यावरण, पेयजल, कचरा विल्हेवाट प्लांट, इलेक्ट्रिक कार्ट आणि आवाजाच्या पातळीचे नियमितपणे निरीक्षण केले जाते. जेएन पोर्टची पर्यावरण व्यवस्थापन व निरीक्षण योजना (ईएमएमपी) सीएसआयआर-नीरी मुंबई यांनी तयार केली आहे आणि ईएमएमपीच्या नोडल अधिकार्यांची या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दरमहा आढावा बैठक घेतली जाते.