Breaking News

स्वत:ची काळजी घ्या

कोरोना विषाणूमुळे जगभरावर आलेले महामारीचे संकट अद्याप कायम आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. आपल्याकडील रुग्णांचा बरे होण्याचा दरही चांगला आहे. परंतु त्याचा अर्थ आपण बेफिकीरपणे वागू शकतो असा अजिबातच होत नाही. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढतो आहे. तेव्हा हे लक्षात ठेवून प्रत्येकाने अत्यंत काटेकोरपणे स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.

राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होण्यास नुकती कुठे सुरूवात झाली आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये ‘अब तो सब खुल गया’ अशी भावना निर्माण होऊ लागली असतानाच, शिथिलता जीवघेणी ठरते आहे असे वाटल्यास आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागू शकतो असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 52 हजार 667 इतकी आहे. यापैकी 23 हजार 694 रुग्ण बरे झाले असून 27 हजार 109 जण हे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. संपूर्ण राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या बुधवारी 46 हजार 074 इतकी होती. रायगड जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 534 इतकी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘…तर आपल्याला पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल’ असा इशारा दिला त्याचदिवशी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 31 जुलैपर्यंत राजधानी दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या 5.5 लाख इतकी होण्याची भीती व्यक्त केली. हा निव्वळ योगायोग नसून येऊ घातलेल्या परिस्थितीचे हे द्योतक आहे. आजच्या घडीला दिल्लीतील रुग्णांची संख्या 31 हजार 309 इतकी आहे. सध्या ज्या वेगाने दिल्लीत कोरोनाच्या केसेस दुप्पट होत आहेत ते पाहिले असता 31 जुलैपर्यंत दिल्लीतील रुग्णसंख्या 5.5 लाखावर जाण्याची शक्यता असून तेव्हा आपल्याला 80 हजार बेड्सची गरज भासेल असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. एकंदर जगभरातील कोरोना संकट अधिक गहिरे होत चालल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनेही काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. विशेषत: अमेरिका व शेजारी राष्ट्रे, दक्षिण आशिया तसेच आफ्रिका खंडातील देशांमध्ये रोजच्या रोज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये महिनाभरापूर्वीपर्यंत हजारोंच्या संख्येने कोरोना मृत्यूची नोंद झालेली दिसली होती. परंतु आता तिथल्या अनेक देशांमध्ये परिस्थिती सुधारते आहे हे दिलासादायक असले तरी कुठेच गाफील राहून चालणार नाही असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मास्कचा वापर करणे, घराबाहेर वावरताना योग्य ते अंतर राखणे (सोशल डिस्टन्सिंग), आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राखली जाईल असा आहारविहार राखणे तसेच स्वच्छताविषयक अन्य सूचनांचे पालन करत राहणे या सार्‍याला तूर्तास तरी पर्याय दिसत नाही. भारतात कोरोना रुग्ण संख्येचा उच्चांक (पीक) जुलै महिन्यात गाठला जाईल असा उल्लेख अलीकडे अनेक ठिकाणी होताना दिसतो आहे. या वास्तवाची जाणीव समाजाच्या अगदी खालच्या स्तरातील माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. जेणेकरून कुणाच्याही बेफिकिरीची किंमत समाजाला मोजायला लागता कामा नये. लॉकडाऊनमधून अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळेच निर्बंध शिथिल करण्याचे पाऊल उचलले जाते आहे. परंतु त्यामुळे खबरदारी घेण्यात ढिलेपणा अजिबातच येता कामा नये.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply