उरण : प्रतिनिधी
वशेणी-दादर खाडीपूल आता वाहनांसाठी खुला करण्यात आल्याने वाहनचालकांची गैरसोय दूर झाली असून या मार्गावरील नागरिकांना दिलासा
मिळाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कोकणपट्टीत पसरू नये यासाठी खारपाडा येथील महामार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात होती. त्यामुळे अनेक वाहने या वशेणी-दादर पुलावरून अधिक प्रमाणात येऊ लागल्याने पेण तालुक्यातील दादर, कळवे, जोहे आदी गावकर्यांनी पेण पोलिसांना हा मार्ग बंद करण्याचे सूचित केल्याने लॉकडाऊनमध्ये हा वशेणी-दादर खाडीपूल दोन्ही बाजूने दगड व झाडे-झुडपे लावून वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे अधिकृतपणे प्रवास करणार्या वाहनचालक, प्रवाशांना आठ ते दहा किलोमीटरचा वळसा घेऊन खारपाडा मार्गे जावे लागत होते.
मात्र हा वशेणी-दादर खाडीपूल आता वाहनांसाठी खुला करण्यात आल्याने ही गैरसोय दूर झाली असून या मार्गावरील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे हा पूल बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रवासी, नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.
उरण पेणला जवळ जोडणारा रस्ता म्हणून सर्वजण वशेणी व पेण दादर मार्गाचा वापर करतात. हातावर पोट असणारे भाजीपाला व फळ विक्रेते यांनाही हा मार्ग फायदेशीर ठरतो. परंतु कोरोनासाठी खबरदारी म्हणून हा मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी नागरिकांना 8 ते 10 किमीचा वळसा मारुन प्रवास करावा लागत होता. मात्र मंगळवारपासून वशेणी-दादर खाडीवरील हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनचालक व प्रवाशांना आणि व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.