Breaking News

वढाव-बोर्झे खारभूमी योजनेला लवकरच नवीन ठेकेदार; तहसीलदारांचे आश्वासन

पेण ः प्रतिनिधी

पाच वर्षांपासून रखडलेल्या वढाव-बोर्झे खारभूमी योजनेच्या कामासाठी नवीन ठेकेदार निवडण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू झाली आहे. या योजनेसाठी एप्रिलमध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात येईल असे आश्वासन पेण तहसीलदारांनी दिल्याने मोठे वढाव ग्रामस्थांच्या मागणीला  यश आले आहे. वढाव-बोर्झे खारभूमी योजना नादुरुस्त झाल्याने खारे पाणी शेतात शिरून वारंवार शेतीचे नुकसान होत होते. या योजनेचे नूतनीकरण व्हावे, यासाठी मोठे वढाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार शासनाच्या खारभूमी विकास विभागाकडून या योजनेच्या नूतनीकरणाकरीता चार कोटी सात लाख एवढा निधी 2018 साली मंजूर झाला आहे. मात्र गेल्या चार वर्षांत ठेकेदाराला दोन वेळा मुदतवाढ देऊनही हे काम ठेकेदाराला पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे बांध फुटून भातशेतीत खारे पाणी शिरून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. वढाव ग्रामस्थांनी वारंवार खारभूमी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र पेण येथील खारभूमी विभागाच्या अधिकार्‍यांनी कोणत्याही प्रकारे लक्ष न दिल्याने वढाव-बोर्झे, खारभूमी विकास योजनेच्या पाच किमी बांधाच्या पुनर्बांधणी योजनेत झालेला विलंबविरोधात संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण करण्याची रितसर नोटीस दिली होती. याच अनुषंगाने रायगड जिल्हाधिकार्‍यांनी पेण तहसीलदारांशी केलेल्या चर्चेतून मार्ग काढत या खारभूमी विकास योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply