नवी मुंबई : बातमीदार
कोरोनामुळे नवी मुंबईत बुधवारी (दि. 10) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा शंभरीपार जाऊन 101 झाला आहे, तर तब्बल 156 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याचा हाही एक उच्चांक ठरला आहे. दुसरीकडे 67 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
नवी मुंबईत आतापर्यंत एकूण तीन हजार 219 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून, बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक हजार 915 झाली आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईतील महापालिका तसेच विविध खासगी रुग्णालयांत एक हजार 203 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मे महिन्याच्या तुलनेत नवी मुंबई महापालिका हद्दीत जून महिन्यात कोरोनाबाधितांचा दर वाढत आहे. दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे एकूण आकडा तीन हजारांच्या वर पोहचला. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या मनात धाकधूक वाढली आहे, तर कोरोना आजारातील रुग्णांचे मृत्यूसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या संख्येने शंभरी पार केली आहे. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे जून महिन्यातील नऊ दिवसांत नऊशेच्या आसपास रुग्णांची नोंद झाली आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्ण साधारणतः मार्च महिन्याच्या मध्यावर दिसू लागले. त्या वेळी दररोज दोन ते चार असे प्रमाण असलेले रुग्ण एप्रिल महिन्यात दरदिवशी 50 ते 60 इतक्या संख्येने वाढू लागले. त्यानंतर मे महिन्यात 60 ते 80 एवढ्या प्रकारची कोरोना रुग्णांची संख्या दररोज पुढे येऊ लागली. जून महिना सुरू झाल्यापासून तर कोरोना संसर्ग झालेले रुग्ण 90 ते 128दरम्यान आढळून येऊ लागले आहेत.
दरम्यान, पावसाळा सुरू होतानाच लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये 46 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनामुळे रायगड जिल्ह्यात बुधवारी
(दि. 10) आणखी 46 रुग्णांची भर पडली असून, एकाचा बळी गेला आहे.
नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 26, पनवेल ग्रामीणमधील 10, महाड तालुक्यातील चार, कर्जत व अलिबाग तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि उरण व खालापूर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, तर महाडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
46 कोरोनाबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कारोना रुग्णांचा आकडा आता 1551वर जाऊन पोहचला असून, मृतांची संख्या 67 झाली आहे.