चक्रीवादळातील नुकसानीची करणार पाहणी
मुंबई : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला जोरदार तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून कोकणवासीयांना आधार देण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौर्यावर येत आहेत. 11 व 12 जून असा त्यांचा दौरा आहे.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या कोकण दौर्याची सुरुवात गुरुवारी (दि. 11) रायगड जिल्ह्यातून होणार आहे. ते सकाळी 9.45 वा. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथे भेट घेणार आहेत. त्यानंतर 10.30 वा. अलिबाग तालुक्यातील चौल येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. पुढे दुपारी 1 वा. मुरूड तालुक्यातील काशीद येथे, 1.30 वा. राजपुरी, 3.30 वा. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर आणि सायंकाळी 4.45 वा. श्रीवर्धन येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून रात्री ते महाडला मुक्काम करणार आहेत.
कोकणच्या मदतीला भाजप
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासीयांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात कोकणच्या मदतीला भाजप हे अभियान पक्षाने हाती घेतले. जनसहभागातून गोळा झालेली आणि भाजपाच्या वतीने 14 ट्रक मदतसामुग्री यापूर्वीच मुंबई, ठाणे, पनवेल येथून कोकणला रवाना झाली. या मदतसामुग्रीत अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल, कोळसा, सिमेंटचे पत्रे, ताडपत्री, सोलर कंदील, मेणबत्ती, माचिस आदींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विजेसाठी सोलर कंदील आणि पावसाळा लक्षात घेता निवार्यासाठी ताडपत्री आणि सिमेंट पत्रे यावर भर देण्यात आला आहे.