Breaking News

दुकानदारी बंद पडल्यानेच राज यांचे फ्रस्टेशन

मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

मुंबई ः प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली. स्वत:च्या काकाशी प्रामाणिक राहिले असते, तर दुसर्‍याच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतलीय. दुकानदारी बंद पडल्यानेच ते फ्रस्टेशन काढत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.  

राज ठाकरेंनी सोलापूरच्या सभेत भाजपा सरकारवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नावर उत्तरे दिली. लोकांना शहाणपणा शिकविण्यापेक्षा तुम्ही काय केले ते सांगा? तुमचं कर्तृत्व काय? लोकांनी तुम्हाला का नाकारलं याचा विचार करा. केवळ चांगलं भाषण करता येते म्हणजे झाले असे नाही. घरात बसून तेंडुलकरने फुलटॉस असाच खेळायला पाहिजे होता, तसाच खेळायला पाहिजे होता, हे सांगणे सोपे असते, पण प्रत्यक्ष मैदानात येऊन खेळायला हवे. राज ठाकरे हे रिटायर्ड असून ते आता कॉमेंट्रीमनची भूमिका बजावत आहेत. माहिती नाही यांना मानधन मिळतंय की नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. 

तसेच डिजिटल हरिसाल गावच्या जाहिरातीतील मुलाबाबतची दुसरी बाजूही मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. राज ठाकरे चार वर्षांपूर्वी कधी हरिसालला गेले होते का? आम्ही त्या मुलाला मॉडेल म्हणून घेतले नाही. गावातील त्या मुलानेच तिथे गेलेल्या टीमला स्वत: गाव दाखवले. गावात काय काय बदल झाले, परिवर्तन झाले हे त्या मुलानेच त्या टीमला दाखवले. मी त्याचे व्हिडीओही तुम्हाला देऊ शकतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या सोलापूरच्या सभेतील मुद्दा खोडून काढला आहे.

राज ठाकरेंची दुकानदारी बंद पडल्याने ते फ्रस्टेशन काढत आहेत. राज ठाकरेंची अवस्था ही क्रिकेटमधील रिटायर्ड कॉमेंट्रीमनसारखी आहे. त्यामुळेच भाजपा आणि मोदींना ते लक्ष्य करीत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले, तसेच हरिसालविषयी बोलताना चार वर्षांपूर्वीचे हरिसाल वेगळे होते आणि आज पाहाल तर हरिसाल वेगळे आहे. हरिसालमध्ये कुठलेही 4-जी टॉवर बसविण्यात आलेले नाहीत. ते गाव डिजिटल करण्यासाठी एक वेगळीच तंत्रप्रणाली वापरण्यात आली आहे. 

व्हाइटस्पेस नावाची नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. टीव्हीच्या लहरींप्रमाणे स्पेक्ट्रमच्या माध्यमातून तेथे इंटरनेट सेवा पुरविण्यात आली असून त्याप्रमाणे हे गाव डिजिटल बनविण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरेंना या बाबी माहिती नसून केवळ मुंबईतील दादरला बसून हरिसाल समजत नसतं, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे, तसेच गावातील त्या मुलासंदर्भात बोलायचं झाल्यास, हे सांगतात हा मुलगा पुण्यात सापडला. आता राजकारण करायचे म्हटल्यावर हे शक्य आहे आणि गावाकडचा एखादा मुलगा नोकरीसाठी पुणे, मुंबईकडे येत असेल, तर त्यात गैर काय, असे फडणवीस यांनी सांगितले. गावात किमान वेतनाची कामे आम्ही देत आहोत, पण त्या गावात इंडस्ट्री तर उभी करू शकत नाही. निदान हे तरी समजायला हवे. केवळ फ्रस्टेशन काढण्यसाठीच राज ठाकरेंकडून ही दिशाभूल होत आहे. त्यामुळे राज ठाकरेंना आम्ही महत्त्व देत नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply