पनवेल ः वार्ताहर
राज्य सरकारने नाभिक समाजास व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
सदर व्यवसाय नाभिक समाज सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करेल. सध्या महाराष्ट्रात लाखो युवकांचे कुटुंब हे सलूनचा व्यवसाय करीत आहेत. केस कापणे, दाढी करणे या व्यवसायात असणार्या कारागिरांना दुसरे कोणतेच काम येत नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जवळजवळ तीन महिने सर्व कारागीर घरी बसून आहेत. त्यांच्याजवळील जमापुंजीसुद्धा संपल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत हे कारागीर उपासमारीने मरण्याची दाट शक्यता आहे. अनेक जण एक वेळच जेवून दिवस ढकलत आहेत. तरी शासनाने या समाजाकडे सहानुभूतीने पाहून त्यांना व्यवसाय सुरू करण्यास योग्य अटी व शर्ती घालून परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी शासनाकडे केली आहे.