मुरूडमधील नागरिकांचा महावितरणला इशारा
मुरूड : प्रतिनिधी
मुरूड शहरासह तालुक्यातील 72 गावे गेल्या 16 दिवसांपासून वीजपुरवठ्याविना अंधारात आहेत. नागरिक या परिस्थितीला वैतागले असून, त्यांच्या भावनांचा बांध अखेर फुटला. तहसील कार्यालयात झालेल्या सभेत त्रस्त नागरिकांनी महावितरणच्या कासवछाप काराभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निसर्ग चक्रीवादळ झाल्यापासून मुरूडची विद्युत व्यवस्था कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते व त्रस्त नागरिकांची सभा गुरुवारी (दि. 18) तहसीलदार गमन गावित यांच्या दालनात झाली. या वेळी नागरिकांनी आपला रोष व्यक्तकेला. नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर यांनी जर आज सायंकाळपर्यंत मुरूडमध्ये वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. अरविंद गायकर म्हणाले की, तहसीलदारांनी महावितरणचा आढावा घेणे आवश्यक होते, परंतु ते लक्ष देत नसल्याने महावितरणचे चांगलेच फावले आहे.
उपकार्यकारी अभियंता येरेकर यांची बदली करा, अशी मागणीही त्यांनी केली. नगरसेवक मनोज भगत यांनी मदत करूनसुद्धा वीज मंडळ आपले काम वेगाने करीत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. माजी नगरसेवक प्रकाश सरपाटील यांनी वीज मंडळास लागणारे मनुष्यबळ मोफत पुरविणार असल्याचे सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी जनतेने कायदा व सुव्यवस्था याचे पालन करावे. संतापाच्या भरात कोणतेही गैरकृत्य करू नये तसेच वीज मंडळाचीसुद्धा बाजू ऐकून घेण्याचे आवाहन केले.
या वेळी महावितरणचे पेण येथील अधीक्षक अभियंता डी. आर. पाटील यांनी सांगितले की, पाबरेपासून मुरूड येथील स्विचिंग सेंटरपर्यंत विजेचे 72 पोल पडले आहेत. शंभर लोकांचा समूह तेथे काम करीत आहे. पाबरे येथील मुख्य वाहिनीचे काम करीत असताना पीन डिस्क फेल्युअर होत असल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. सध्या रिप्लेसमेंटचे काम जोरदार सुरू असून, मुरूडचे स्विचिंग सेंटर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्विचिंग सेंटरमध्ये वीजपुरवठा प्राप्त होताच मुरूड शहरात किमान 40 टक्के भागात वीज येईल. त्यानंतर शहरातील दुरुस्तीच्या कामाला वेग प्राप्त होईल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
सभेस सभापती अशिका ठाकूर, ललित जैन, कुणाल सतविडकर, माजी सरपंच मुश्रत उलडे, जाहिद फकजी, अल्ताफ खतीब, महेश कारभारी, मनीष माळी, बाबू सुर्वे, कीर्ती शहा आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते.