रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्रकिनारी असलेल्या नारळ, सुपारीच्या बागा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. मुंबईपासून अवघ्या 160 किलोमीटर अंतरावर असल्याने मुरूडमध्ये दर शनिवार -रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड येथील जंजिरा किल्ला, काशीद समुद्रकिनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बीच अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना नेहमीच आकर्षीत करीत असतात. त्यामुळे रायगड जिल्ह्यात फक्त शनिवार व रविवार या दोन दिवसात एक लाखापेक्षा जास्त पर्यटक येऊन जात असतात. हे पर्यटक या दोन दिवसात स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध करून देतात. हॉटेल व लॉजिंग सर्वत्र हाऊस फुल्ल असतात. मात्र मागील दोन आठवड्यापासून पर्यटकांनी पाठ फिरवल्याने हॉटेल व लॉजिंग व्यवसायिकांची चिंता वाढली आहे. पर्यटकांची संख्या कमी झाल्यामुळे एरव्ही सुट्टीमध्ये फुल्ल असणार्या लॉजमधील एखाददुसरी रुम सध्या भाड्याने जात आहे. असेच चित्र हॉटेल्समध्ये दिसून येत आहे. पुर्वी शनिवार, रविवारी हॉटेलमधील सगळे बाकडे फुल होऊन, अनेक पर्यटक वेटिंगवर असावयाचे. मात्र सध्या हॉटेलमधील रिकामे टेबल्स पर्यटकांची वाट पहात असतात.
हौशी पर्यटक चार दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, किहीम, काशीद बीच, मुरुड, जंजिरा, दिवेआगर, हरिहरेश्वर या ठिकाणी गर्दी करतात. मात्र मागील दोन आठवड्यापासून पर्यटकांचा ओघ कमी झाल्यामुळे सर्वच व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कोरोना वाढण्याच्या पार्श्वभूमीवर सध्या पुणे, मुंबई येथे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता पुन्हा लॉकडाऊन आणला तर विनाकारण अडकून पडू, या भितीने लोक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. टीव्ही चॅनेलवरील बातम्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडे दाखवले जात असल्याने पर्यटकांच्या मनात भितीने घर केले आहे. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी पर्यटकांनी बाहेर न पडण्याचे ठरवल्याने पर्यटन स्थळांवरील मोठी गर्दी ओसरली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने आणि लॉकडाऊनच्या अनिश्चिततेमुळे पालक सुट्टीच्या दिवसात घरात राहून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ लागल्यानेही पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे.
मुरुड शहरात फेब्रुवारी अखेर पर्यटकांची गर्दी होती. स्वाभाविकपणे स्थानिक व्यवसायिकांची कमाई चांगली होत होती. समुद्रकिनार्यावरील पाव – वडा सेंटर, शहाळे पाणी, स्नॅक्स, पाणीपुरी, भेलपुरी, उपहारगृहे विशेषतः शुक्रवार, शनिवार आणि रविवारी फुलून जात होती. त्यामुळे स्थानिकांचा व्यवसाय तेजीत होता. मात्र सध्या पर्यटकांनी पाठ फिरविल्याने स्थानिकांच्या व्यवसायाला अचानक ब्रेक लागल्याचे पहावयास मिळत आहे. समुद्रकिनारी असणारे वॉटरस्पोर्टस, घोडागाडी, उंटसफर, बोटींग व्यवसाय थंड पडले आहेत.
गेल्या आठवड्यापासून ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरील पर्यटकांची संख्या 70 टक्के घटली असून राजपुरी बंदरातून प्रवासी वाहतूक करणार्या शिडांच्या होड्यांना पर्यटकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. जंजिरा किल्ल्यावर जलवाहतूक करण्यासाठी 13 शिडांच्या बोटी तर दोन मशीनवाल्या बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु मागील दोन आठवड्यापासून यापैकी काही बोटी किनार्यालाच बांधून ठेवण्यात आल्या आहेत. या बोटीवरील बहुतांशी कामगार बसून आहेत. त्यामुळे येथे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जंजिरा किल्ल्यावर जाणारे पर्यटकही मोठ्या संख्येने कमी झाले आहेत. किल्ल्याच्या परिसरात असणारे टोपी, गॉगल, शहाळी व चहा टपरीवाल्यांचाही धंदा रोडावला आहे.
मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारीसुद्धा पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. काशीद हे सर्वाधिक पर्यटक असणारे ठिकाण आहे. मात्र मागील काही आठवड्यापासून येथेसुद्धा पर्यटकसंख्या कमी झाल्याने स्थानिक व्यवसायधारक चिंतेत दिसून येत आहेत.
वास्तविक शुक्रवारी बोटीतून जाण्यासाठी पर्यटकांच्या उड्या पडतात. मात्र या शुक्रवार, शनिवार व रविवारी 14 शिडाच्या होड्यांना पर्यटकांअभावी रिकामे परतावे लागले, इतकी पर्यटकांची संख्या रोडावली असल्याचे प्रवासी बोट चालक संघटनेचे पदाधिकारी जावेद कारबारी यांनी सांगितले.
मुरुड बीचवर पर्यटकांची संख्या दोन आठवड्यात खुपच कमी झाली आहे. कोरोना वाढत असल्याच्या वार्ता झपाट्याने पसरल्यानेच पर्यटकांचा ओघ कमी झाल्याचे दि बांबू नेस्ट हाऊसचे मालक प्रयाग केंडू यांनी सांगितले.
साई गौरी हॉलिडे होम लॉजचे मालक मनोहर बैले म्हणाले की, टीव्हीवर कोरोना पेशंटची वाढती संख्या पाहून पर्यटक बाहेर पडणे टाळत आहेत. आमच्याकडे आगाऊ बुकिंग होती, मात्र त्या अचानकपणे रद्द करण्यात आल्या आहेत. मागील दोन आठवड्यात 25 टक्केसुद्धा व्यवसाय झालेला नाही.
मागील दोन आठवड्यात पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली आहे. त्यामुळे व्यवसायात मोठी घट आली आहे. वास्तविक पहाता मुरुड तालुका कोरोना मुक्त आहे. त्यामुळे पर्यटकांनी मुरुडला भीती न बाळगता आले पाहिजे.
-विनायक धुमाळ, मालक, हॉटेल विनायक व लॉजिंग, मुरूड
-संजय करडे, खबरबात