Breaking News

सिडकोतर्फे नैना प्रकल्पाच्या जमीन मालकांना आवाहन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई विमानतळाभोवतालच्या 371 चौ.कि.मी. च्या प्रदेशात साकारण्यात येत असलेल्या, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने होत असून प्रकल्पाकरिता प्रस्तावित 11 नगर रचना योजनांपैकी क्र. 1 ते 3 या योजनांवर विविध स्तरांवर कार्यावाही सुरू आहे. तर योजना क्र. 4 ते 11 या जमीन मालकांच्या मागणीच्या प्राधान्याप्रमाणे राबविण्याकरिता संबंधित जमीन मालकांना संमतीपत्र सादर करण्याचे आवाहनही सिडकोकडून करण्यात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाभोवतालच्या प्रदेशाची होणारी संभाव्य अनिर्बंध वाढ रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 175 गावांतील मिळून 371 चौ.कि.मी. क्षेत्राच्या प्रदेशात सिडकोतर्फे नैना हे पर्यावरणपूरक विकासावर आधारित, निवासी, वाणिज्यिक, शैक्षणिक इ. सोयी सुविधांनी परिपूर्ण असे अत्याधुनिक व सुनियोजित शहर विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाकरिता सिडको मध्यस्थ/समन्वयक म्हणून भूमिका बजावित आहे. नैना प्रकल्पाच्या नगर रचना परियोजनांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जमीन संपादन न करता सहभागी तत्त्वावर भूखंडांचा विकास केला जाणार आहे. योजनेत सहभागी होणारे भूधारक विकासाकरिता समान जमिनीचे योगदान देणार आहेत. या योजनेतील जमीन मालकांना मूळ भूखंडाच्या 40 टक्के भूखंड हा विकासयोग्य नियमित आकाराचा अंतिम भूखंड म्हणून परत मिळणार या भूखंडाकरिता मूळ जमिनीएवढाच चटई क्षेत्र निर्देशांक लागू असणार आहे. उर्वरित 60 टक्के जमिनीवर सिडकोकडून रस्ते, खेळाचे मैदान, बगिचा, शाळा, ग्रोथ सेंटर इ. भौतिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. जमीन मालकाची जमीन कुठल्याही आरक्षणाने बाधित होणार असली तरी त्यांना 40 टक्के भूखंड मिळणार आहे. सिडकोकडून नैना प्रकल्पाच्या नगर रचना परियोजना क्र. 4 ते 11 या जमीन मालकांच्या मागणीच्या प्राधान्याप्रमाणे हाती घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून या योजनांची अंमलबजावणी व त्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास शीघ्र गतीने व्हावा, याकरिता संबंधित जमीन मालकांनी लवकरात लवकर आपले संमतीपत्र सादर करण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. यामुळे या परियोजना प्राधान्याने सुरू करता येऊन जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा वापर विकासकामांकरिता करता येणे सुकर होईल व त्यांच्या जमिनीला वेळेच्या आधी मागणी वाढणार आहे.

नैना नगर रचना परियोजनांची अंमलबजावणी जलद गतीने व अत्यंत पारदर्शकरीत्या व्हावी यावर सिडकोचा कटाक्ष आहे. जमीन मालकांच्या सहभागातून व सहकार्यातून साकारण्यात येणारा हा प्रकल्प नगर विकास क्षेत्रातील एक आगळावेगळा प्रकल्प ठरणार आहे. 

-डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको 

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply