रोहे ः प्रतिनिधी – रोहा शहरात गुरुवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर रोहा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यने नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. चांगला पाऊस पडल्याने तालुक्यात लावणीसह अन्य शेतीच्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी सुरू झालेला पाऊस सातत्याने बरसत असल्याने शनिवारीही (दि. 4) पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले.
हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीत विशेषतः कोकणात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिल्यानंतर पावसाने रोहा तालुक्यात रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. रोहा शहरासह ग्रामीण भागात गेली दोन दिवस दमदार पाऊस झाला. त्यामुळे रोहा तालुक्यातील डोंगरदर्यांतून मोठ्या प्रमाणात नाले वाहू लागले आहेत. हे पाणी कुंडलिका नदीला मिळत असल्याने कुंडलिका नदीही भरून वाहू लागली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. कोरोनाचा संसर्गामुळे नागरिक घरी राहणे पसंत करीत असून रोहा शहरासह ग्रामीण भागातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत 12 जुलैपर्यंत लाकडाऊन आहे. त्यातच आता मुसळधार पाऊस असल्याने रस्त्यावर तुरळक कामगार, पोलीस व सरकारी अधिकार्यांशिवाय इतर कोणी दिसत नव्हते. दोन दिवस सलग पाऊस पडल्याने रोह्याचे वातावरण बदलले असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. सर्वत्र पाणीच पाणी असे दृश्य दिसून येत आहे. गुरुवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर तर पडलाच परंतु शनिवारीही दिवसभर पावसाने सातत्य ठेवले.
चांगला पाऊस पडत असल्याने थांबलेल्या लावण्या पुन्हा वेगाने सुरू झाल्या असून रोहा तालुक्यातील मेढा, सानेगाव, चणेरा, घोसाळे, भालगाव, धाटाव, कोलाड, चणेरा, खांब, सुतारवाडी, पिंगळसई परिसरात लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे रोहा तालुक्यातील शेतकरी सुखावला असून शेतीकामाला वेग आला आहे. विशेषतः मुंबईकर आपल्या गावी आल्याने ते लावणीच्या कामात आनंदाने सहभागी होताना दिसत आहेत.