माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महमूद धुंदवारे यांनी पक्षनेतृत्व तसेच तटकरे कुटुंबीयांबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली असून, लवकरच आपण शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. महमूद धुंदवारे गेली तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत आहेत. शेवटी शनिवारी (दि. 4) त्यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त करून शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना धुंदवारे म्हणाले की, गेली 10 वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम आमचे जवळचे स्नेही माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे करीत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्यावर प्रभागातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर माझी माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मी पक्षाचे
काम प्रत्येक निवडणुकीत इमाने इतबारे केले, मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये पक्षनेतृत्व तटकरे कुटुंबीय आम्हाला जाणूनबुजून डावलत आहे. त्यामुळे माझे समर्थकही नाराज झाले आहेत. पक्षाचे काम आम्ही प्रामाणिकपणे करतो, पण पक्षनेतृत्व आम्हाला डावलून अलीकडच्या काळात विरोधकांना जवळ करू लागले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्षनेतृत्वाला विसर पडू लागल्याने लवकरच आपण शहर अध्यक्षपदाचा राजीनामा तालुकाध्यक्षांना पाठवून वेगळा विचार करणार असल्याचे संकेत देऊन यापुढे आनंदशेठ यादव यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे धुंदवारे यांनी स्पष्ट केले आहे.